मान्सूनचे आगमन लांबणीवर

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | दरवर्षी मान्सून ८ जूनच्या आसपास हजेरी लावतो, पण यावर्षी प्री-मान्सूनने देखील हुलकावणी दिली असून मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे वातावरणातीलच नव्हे तर जमिनीतील तप्त उष्णतेमुळे सर्वसामान्यांना तीव्र उष्णतेचा फटका सहन करावा लागत असून मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावर्षी राज्यात समाधानकारक पर्जन्यमान असून नेहमीपेक्षा वेळेआधीच मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याद्वारे वर्तवण्यात आला होता. परंतु हा अंदाज फोल ठरला असून वेळ निघून गेल्यानंतरही अद्याप राज्यात मान्सूनचे आगमन झालेले नाही. त्यामुळे हवामान विभाग पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहे. गेल्या काही वर्षापूर्वी मार्च ते मे दरम्यान मान्सूनपूर्व पावसाची हजेरी हमखास असायची. त्यामुळे शेतमशागतीच्या कामांना या मान्सूनपूर्व पावसाचा थोडाफार हातभार लागत असे. शिवाय कोरड्या ढगांमुळे उनसावलीचा लपंडाव तप्त उन्हाळ्यात काहीसा गारवा देऊन जात असे. परंतु ग्लोबल वार्मिगमुळे आठ पंधरा वर्षापासून निर्सग चक्रात बदल झाले आहेत. यावर्षी तर कोरडे ढग देखील नसल्याने ऊनसावली तर सोडाच मान्सूनपूर्व पावसाच्या सरीच आलेल्या नाहीत.

यावर्षी सरासरी तापमान ४२ ते ४६ अंशादरम्यान असून तापमान कायम आहे. त्यामुळे जून महिन्यात वैशाख वणवा अजूनही जाणवत आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या पुढील वाटचालीस अडथळे निर्माण झाल्यामुळे कर्नाटक, गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगाळला आहे. येत्या दोन चार दिवसात मान्सूनच्या आगमनासाठी महाराष्ट्रात पोषक हवामान तयार होऊन १२ जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज पुन्हा हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

 

 

Protected Content