कारवाई टाळण्यासाठी गाळेधारकांनी रक्कम भरणे हाच एक मार्ग – डॉ. टेकाळे

IMG 20191014 175408

जळगाव, प्रतिनिधी | महापालिकेने थकीत बिल भरण्यासाठी गाळेधारकांना दिलेली मुदत शनिवारी संपली आहे. आज सकाळी महापालिकेतर्फे फुले मार्केटमधील गाळे सील करण्याची कारवाई करण्यात येत असतांना काही गाळेधारकांनी मनपा प्रशासनास विरोध केला होता. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी गाळेधारकांनी आयुक्तांची भेट घेतली.

आज सायंकाळी माजी आमदार गुरुमुख जगवानी, गाळेधारकांच्या कोअर कमेटी अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली गाळेधारकांनी आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांची भेट घेवून आपली व्यथा मांडली. यावेळी आयुक्तांनी कारवाई टाळण्यासाठी रक्कम भरणे, हा एकमेव मार्ग असल्याचे यावेळी स्पष्ट सांगितले यावेळी गाळेधारकांनी सांगितले की, २०१२ पासून महापालिकेची गाळेधारकांकडे थकबाकी आहे. महापालिकेने अवास्तव बिल आकारणी केल्याची तक्रार गाळेधारकांनी यापूर्वीही केलीआहे. यानुसार २०१८ मध्ये भाजपची सत्ता पालिकेवर आल्यानंतर गाळेधारकांशी वेळोवेळी चर्चा करण्यात आली. यानंतर पालकमंत्री ना. गिरीश महाजन व आ. सुरेश भोळे यांनी मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आहे. गाळेधारकांचे नुकसान होऊ नये, त्यांच्यावर आर्थिक बोजा पडू नये, याकडे घसारा, दंड व कायदेशीर बाबींचा विचार करून नवीन सुधारित कमी केलेली बिले देण्यात आली आहेत. या बदलाला बऱ्याच गाळेधारकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तरीही काही गाळेधारकांची पैसे भरण्याची मानसिकता दिसून येत नसून ते संपूर्ण बिल व दंड माफ करण्याची मागणी करत आहेत. याबाबत आयुक्त डॉ. टेकाळे यांनी गाळेधारकांना थकबाकी भरावीच लागेल, याची जाणीव यावेळी करून दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, ११ ऑक्टोबरपर्यंत थकबाकी रक्कम भरण्यासाठी मुदत दिली होती. आता ती मुदत संपल्याने गाळेधारकांनी लवकरात लवकर थकबाकी भरावी जेणेकरून पुढील कारवाई टाळता येईल. आ. जगवानी यांनीही व्यापाऱ्यांना थकीत रक्कम भरण्याचे आवाहन केले. डॉ. टेकाळे यांनी उद्या ११.०० वाजेपर्यंत चेक जमा करण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले आहे, त्यानंतरही जे व्यापारी थकबाकीची सर्व रक्कम किंवा थकीत रकमेचा निम्मा हिस्सा भरणार नाहीत, अशा गाळेधारकांवर कारवाई करणे सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Protected Content