केळी उत्पादकांना फसवणार्‍यांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी | केळी उत्पादकांची तब्बल ३५ लाख रूपयांची फसवणूक करणार्‍या दोघा व्यापार्‍यांवर तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील शेतकर्‍यांची केळी खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुधीर मधुकर चौधरी (रा. पिलखेडा, ता. जळगाव), प्रमोद हरी पवार (रा.नंदगाव), योगराज नामदेव सपकाळे (रा. फुफनी), विजय रामकृष्ण सपकाळे (रा. फुफनी), रतिलाल माणिक पवार (रा. भोकर), रत्नाकर शिवलाल सोनवणे (रा. देवगाव), अनिल बाबुराव चौधरी (रा. पिलखेडा), मोहनचंद नारायण सोनवणे (रा. करंज), संजय रावण पाटील (रा. भोकर), मोहन एकनाथ सोनवणे (रा. फुफनी), शिवाजी पुरमल पाटील (रा. नंदगाव), मच्छिंद्र झावरू कोळी (रा. धानोरा), झेंडू महारू कोळी (रा. धार्डी), किशोर देवाजी सोनवणे (रा. गाढोदा), शिवदास भगवान चौधरी (रा. पिलखेडा) या १५ शेतकर्‍यांची ३५ लाख २४ हजार ७२४ रूपयांची फसवणूक झाली आहे. अशोक रघुनाथ पाटील (रा. निंभोरा, ता. रावेर) आणि महेंद्र सिताराम निकम (रा. जारगाव, ता. पाचोरा) असे फसवणूक करणार्‍या व्यापार्‍यांची नावे आहेत. ते गेल्या अनेक महिन्यांपासून पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत होते.

दरम्यान, वारंवार मागूनही पैसे मिळत नसल्याने सुधीर चौधरी यांनी १४ शेतकर्‍यांना सोबत घेवून तालुका पोलिस ठाण्यात दोन्ही व्यापार्‍यांविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content