जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ञांनी एका गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत मेंदूतील रक्ताची गाठ (हिमॅटोमा) यशस्वीरित्या काढून रुग्णाला नवजीवन दिले आहे. उच्च रक्तदाबामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव झालेल्या रुग्णाच्या एका बाजूच्या हात-पायाची ताकद कमी झाली होती. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांच्या तातडीच्या उपचारांनी आणि आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील धर्मा कोळी यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. अचानक त्यांच्या डाव्या बाजूच्या हात-पायात कमजोरी जाणवू लागली. डोकेदुखी आणि भोवळ आल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात दाखल झाल्यावर मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपुल राठोड यांनी त्यांची तपासणी केली. प्राथमिक तपासणीत मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याचे निदान झाले. एमआरआय स्कॅनमध्ये मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्ताची गाठ (हिमॅटोमा) तयार झाल्याचे स्पष्ट झाले. गाठ वाढत असल्याने मेंदूवर दबाव येत होता, ज्यामुळे गंभीर न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे डॉ. राठोड यांनी तातडीने क्रेनियोटोमी अँड मायक्रोस्कोपीक हिमॅटोमा इव्हॅक्युएशन पद्धतीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
अनुभवी न्यूरोसर्जन डॉ. विपुल राठोड आणि त्यांच्या टीमने सुमारे तीन तास चाललेली ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. क्रेनियोटोमी प्रक्रियेद्वारे मेंदूतील रक्ताची गाठ नैसर्गिक मार्गाने बाहेर काढण्यात आली. यासाठी मायक्रोस्कोपीक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला, ज्यामुळे मेंदूतील संवेदनशील भागांना कोणतीही इजा झाली नाही. या शस्त्रक्रियेत डॉ. आशिष बावनकर, डॉ. अर्शील शेख, डॉ. शुभम कालरा आणि भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. सतीश, डॉ. शीतल यांनी सहकार्य केले.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले, जिथे तज्ज्ञ डॉक्टरांनी आणि प्रशिक्षित वैद्यकीय सेवक शालीक चौधरी यांनी त्यांची सतत देखरेख केली. काही तासांतच रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. त्यांच्या डाव्या हातापायातील कमजोरी कमी झाली आणि ते हळूहळू पूर्ववत होत आहेत.
या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर डॉ. विपुल राठोड यांनी सांगितले की, उच्च रक्तदाब हे मेंदूतील रक्तस्रावाचे प्रमुख कारण आहे. वेळेत निदान आणि उपचार न मिळाल्यास अर्धांगवायू किंवा गंभीर गुंतागुंत होऊ शकते. या रुग्णाच्या बाबतीत त्वरित निदान आणि शस्त्रक्रियेमुळे त्यांचे प्राण वाचले. डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील आधुनिक सुविधांमुळे ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली, असेही त्यांनी नमूद केले.