पक्षाने परवानगी दिली तर पुरावे जनतेसमोर मांडणार – खडसे (व्हिडिओ)

khadse e1550572684596

जळगाव, प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीत आपल्याविरुद्ध करण्यात आलेल्या कारवायांचे पुरावे आपण पक्षश्रेष्ठींकडे यापूर्वीच सादर केले आहेत. त्यांनी जर आता परवानगी दिली तर लगेचच ते पुरावे नावानिशी पत्रकारांपुढे सादर करेन, असा थेट पवित्रा भाजपा नेते माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी आज येथे जाहीर केला. आज (दि.७) येथे सुरु असलेल्या भाजपच्या आढावा बैठकीसाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

 

या बैठकीला खडसे उशिराने आल्याबद्दल त्यांना पत्रकारांनी कारण विचारले असता ते म्हणाले की, मला ३.३० च्या बैठकीसाठी बोलावले होते, त्याप्रमाणे मी वेळेवर हजर झालो आहे. माझी नाराजी वगैरे काही नाही. मग निवडणुकीच्या आधी व निवडणुकीनंतर त्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीबद्दल विचारले असता त्यांनी त्याबाबत आपण प्रदेशाध्यक्षांकडे व श्रेष्ठींकडे मांडले आहेत. ते मुद्दे आपण गिरीशभाऊंनी सांगितल्याप्रमाणे जनतेसमोर मांडू शकतो, त्यासाठी आधी आता मिटींगमध्ये प्रदेशाध्यक्षांची परवानगी घेतो आणि ते हो म्हणाले तर बैठकीनंतर लगेच तुमच्याकडे ते पुरावे सादर करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुस्तिकेत ७०० पैकी ६६० प्रतिक्रिया माझ्या बाजूने…
यावेळी श्री.खडसे यांनी आपल्यासोबत आणलेली एक पुस्तिका पत्रकारांना दाखवली. त्यावेळी त्यांनी म्हटले की, या पुस्तिकेत मी काही प्रतिक्रिया गोळा केल्या आहेत. साधारणपणे ७०० च्या आसपास प्रतिक्रियांपैकी ६६० प्रतिक्रिया माझ्या बाजूने आहेत. त्यात विरोधकांबद्दलच्या काही प्रतिक्रिया तर वाचल्या जात नाहीत, एवढ्या वाईट आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

 

Protected Content