लक्ष्मणराव देशपांडेंची आठवण करून देणारा प्रयोग नली (रसग्रहण)

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दोन ते चार फेब्रुवारी या कालावधीत यशवंतराव चव्हाण स्मृती परिवर्तन महोत्सवाचं आयोजन जळगाव शहरात करण्यात आलेले आहे. हा सांस्कृतिक महोत्सव एसएमआयटी कॉलेजच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला. याबाबत साहित्यक डॉ. रफीक काझी राही यांनी केलेले हे रसग्रहण

पहिल्या दिवशी प्रथितयश रंगकर्मी व नाटककार शंभू पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला व अलीकडे राज्यस्तरावर प्रशंसित श्रीकांत देशमुख लिखित योगेश पाटील यांनी दिग्दर्शित केलेला व हर्षल पाटील यांच्या सकस अभिनयाने अलंकृत नली हा एकल नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. यापूर्वी एसएमआयटी कॉलेज च्या प्रांगणात नाट्य प्रयोग झालेला नसल्याने प्रतिसादाबद्दल साशंकता असताना नाट्यप्रेमींनी लावलेल्या हजेरीने आयोजक सद्गदित झालेत.

परिवर्तन संस्थेद्वारे अधुन मधुन नवोपक्रमशील कार्यक्रमांचे आयोजन होतच असते पण या सांस्कृतिक महोत्सवाचे विशेषत्व म्हणजे महाराष्ट्रभर सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविणार्‍या
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानन आपल्या वार्षिक उपक्रमाची सुरुवात पारंपारिक जागी व नेहमीच्या जागी न करता पहिल्यांदाच उपनगरीय भागात या महोत्सवाच आयोजन केले याचे श्रेय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रविंद्रभैया पाटिल यांना जाते. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील नामांकित प्रतिष्ठान द्वारा परंपरा मोडून घेतली गेलेली दखल जळगावकरांसाठी निश्‍चितच अभिमानास्पद आहे. तर पहिल्या दिवशी सादर करण्यात आलेल्या नली या एकल नाट्यप्रयोगाची विशेषता म्हणजे हर्षल पाटील यांनी विविध वयोगटातील व ग्रामीण समाजाच्या विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणार्‍या अठरा बहुलिंगी व्यक्तिरेखांची वठवलेली दमदार भुमिका. एकपात्री सदरात मोडणार्‍या प्रयोगात काम करणे फारच आव्हानात्मक असते. कारण रेल्वे गाडी जेव्हा एका पाठोपाठ दुसर्या पटरीवर मार्गक्रमण करते तेव्हा काही अंशी दचके जाणवतात त्याप्रमाणे बहुपात्री नाटक एकाच कलाकाराने सादर करताना जरा देखील कमतरता ठेवली तर फरक जाणवतो. पण हर्षल पाटील यांनी समुद्रात निष्णात नाविक ज्याप्रमाणे पाणभिंतीचा सामना करतो त्या धाटणीने एका भूमिकेतून दुसर्‍या भुमिकेत सहज प्रवेश करून आपली अभिनय क्षमता सिद्ध केली आहे.व् यक्तीरेखेनुरूप आवाजातील आरोह, अवरोह आणि देहबोली यांच्या अचूक मिश्रणामुळे पूर्णवेळ श्रोत्यांना बांधून ठेवण्यात ते यशस्वी झाले.
त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे लहानपणाशी संबंधित सर्व संवादातून अल्लडपणा दृष्टिगोचर करतांनाच जसजशी कथा प्रवास करते तसतसे वयोमानानुसार होणारे देहबोलीतील फरक यथास्थिती प्रदर्शित करत होते. इतके की चौथी पास झाल्यावर तालुक्यातील शाळेत रवाना करणार्‍या आईच्या आवाजात व तरुणपणी नलीला भेटून आल्यावर आईच्या भुमिकेत काढलेल्या आवाजात सुद्धा फरक जाणवतो ही फार मोठी किमया आहे.

त्याच प्रमाणे अशिक्षित ग्रामीण सवंगड्यांची भुमिका साकारताना शुद्ध ग्रामीण बोलीभाषेत केलेली शब्दफेक, तरुणपणी त्यात झालेला बदल अधोरेखित करून त्या त्या व्यक्तिरेखेच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक स्तराचे प्रदर्शन करण्यात हर्षल यशस्वी झाले. त्याशिवाय व्यसनाधीनतेची लक्षणे प्रदर्शित करतांना केलेला अभिनय देखील प्रशंसनीय आहे कारण नमक हराम या चित्रपटात राजेश खन्ना पेक्षा अमिताभ ने दारुड्याची भुमिका चांगल्या प्रकारे वठविल्यानंतर त्याला टर्निंग पॉईंट मिळाला. असो. दारुड्याची भुमिका साकारणे काहीसे कठीण असते हे सांगण्यासाठी ही उठाठेव. थोडक्यात, दिग्दर्शक योगेश पाटील यांनी हर्षल पाटील यांचेकडून वर्‍हाड निघालंय लंडनला सारख्या बहुपात्री नाटकासारखी आव्हानात्मक भुमिका पार पाडुन घेण्यासाठी खूप मेहनत करवून घेतली. वर्‍हाड. ..मध्ये मुख्यतः विनोदाचीच रेलचेल होती पण नली या छोटेखानी नाटकात जीवनाशी संबंधित सर्व रसांचे सम्मिश्रण दिसते त्यादृष्टीने सुद्धा हा एकल प्रयोग आगळा वेगळा ठरतो.

मी नाट्य समीक्षक नाही पण एक श्रोता म्हणून नमूद करू इच्छितो की, नलीच्या लग्नाच्या आणि मृत्युच्या बातमीनंतर दुःख प्रदर्शनास अजूनही वाव आहे. दुःखातिरेक आणखी प्रभावी करण्यासाठी थोडे प्रयत्न अपेक्षित आहेत असे वाटते. जीवनभर मनावर अधिराज्य गाजवणार्‍या पवित्र प्रेमिकेसाठी अश्रूंची प्रेमांजली प्रभावी ठरेल असे वाटते. शंभू पाटलांच्या मुशीत तयार झालेल्या हर्षल पाटलांनी अशीच घोडदौड सुरू ठेवावी आणि परिवर्तन परिवाराचे प्रयोग देश विदेशात प्रसिद्धी पावो हीच सार्थ मनोकामना.

डॉ. काझी रफीक राही
९२७१२६२११७

Add Comment

Protected Content