एमआयडीसी स्थानकाचे सहाय्यक निरिक्षक एसीबीच्या जाळ्यात

 

 

जळगाव प्रतिनिधी । बोदवड येथील तहसीलदारांसह तीन जणांच्या ट्रॅपचे प्रकरण ताजे असतांनाच एमआयडीसी पोलीस स्थानकातील सहाय्यक निरिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या नाशिक येथील पथकाने लाच स्वीकारतांना जेरबंद केल्याने खळबळ उडाली आहे.

सरकारी कर्मचार्‍यांमध्ये लाचखोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. अलीकडेच बोदवडचे तहसीलदार आणि तीन कर्मचार्‍यांना याच प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. यातच आता चक्क सहाय्यक पोलीस निरिक्षकच यात अडकल्याने खळबळ उडाली आहे.

एका गुन्ह्यात तडजोड करण्यासाठी १५ हजारांची मागणी सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप हजारे यांनी मागितली होती. यामुळे संबंधीत व्यक्तीने नाशिक येथील एसीबीकडे तक्रार केली होती. यानुसार नाशिकच्या पथकाने सापळा लाऊन संदीप हजारे यांना अटक केली. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे निरिक्षक उज्वल पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. याबाबत शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content