अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन

मुंबई (वृत्तसंस्था) प्रसिद्ध मराठी अभिनेते रमेश भाटकर यांचे आज दु:खद निधन झाले. भटकर यांनी मुंबईतील एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. कर्करोगाने आजारी असल्याने त्यांच्यावर एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरू होते. आज उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. ‘कमांडर’ आणि ‘हॅलो इन्स्पेक्टर’ या गाजलेल्या टीव्ही मालिकांनी त्यांना विशेष प्रसिद्धी मिळवून दिली होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटात त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका साकारली होती. ही त्यांची अखेरची भूमिका ठरली.

गायक-संगीतकार वासूदेव भटकर यांच्या घरी 3 ऑगस्ट 1949 मध्ये रमेश भाटकर यांचा जन्म झाला होता. 1977 मध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. तीस वर्षांहून अधिक काळ ते अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. वयाची 69 वर्षे पूर्ण केल्यानंतरही त्यांचा कामाचा उत्साह पूर्वीसारखाच कायम असायचा. वयाची पासष्टी ओलांडल्यानंतरही त्यांच्या चेह-यावर म्हातारपणाच्या म्हणाव्या तितक्या खुणा दिसत नव्हत्या. काही दिवसांपूर्वीच ते ‘तू तिथे मी’ आणि ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेत दिसले होते. रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम होते. त्यांनी रंगभूमीवरूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘अश्रूंची झाली फूले’ हे त्यांचे नाटक तर चांगलेच गाजले होते. तसेच त्यांची केव्हा तरी पहाटे, अखेर तू येशीलच, राहू केतू, मुक्ता यांसारखी अनेक नाटकं गाजली आहेत. १९७७ ला चांदोबा चांदोबा भागलास का या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अष्टविनायक, दुनिया करी सलाम, आपली माणसं यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी ९० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.

Add Comment

Protected Content