गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी डॉ. अनिल काकोडकर

0

जळगाव प्रतिनिधी । येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी अणु उर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या जागेवर डॉ. काकोडकर यांची निवड करण्यात आली आहे. यासोबत महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांची संचालकपदावर निवड करण्यात आली आहे. जैन हिल्स येथे झालेल्या गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या संचालकमंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गांधी रिचर्स फाऊंडेशनचे ज्येष्ठ संचालक दलिचंद जैन होते. या बैठकीला डॉ. अनिल काकोडकर, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक दलिचंद जैन, अशोक जैन, अनिल जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुदर्शन अय्यंगार उपस्थित होते. प्रारंभी माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच या बैठकीत माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या नावाने गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून काय करता येऊ शकेल याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा विषय चर्चेला आला. त्यावर अशोक जैन यांनी अध्यक्षपदासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या नावाची सुचना मांडली. त्याला सुदर्शन अय्यंगार यांनी अनुमोदन दिले. सर्वानुमते डॉ. अनिल काकोडकर यांची गांधी रिसर्च फाऊंडेशच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, गांधी रिसर्च फाऊंडेशनमध्ये येताना मला नेहमीच आनंदाची अनुभूती मिळाली आहे. गांधीजींचे तत्वज्ञान जोप र्यंत मनात झीरपत नाही तो पर्यंत अशा स्वरुपाचे काम तुम्ही करू शकत नाही. भवरलालजी जैन आणि न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी गांधी विचारांचा मोठा वारसा आपल्यासाठी सोडुन गेले आहेत, त्यांच्या वाटेवर चालणे सोपे नाही. ही नवी जबाबदारी अतिशय महत्वाची आहे. ती सांभाळण्याचा मी पुर्णपणे प्रयत्न करीन, त्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य मला हवे आहे.

दरम्यान, या निवडीबाबत जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोक जैन म्हणाले की, काकोडकर परिवाराला गांधी विचारांचा वारसा आहे आणि त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. अनिल काकोडकर गांधी विचारांशी जुळलेले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी विज्ञानाच्या आधारे ग्रामीण भागाच्या विकासाच्या संदर्भात मोठे काम केले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास त्यांच्या अनुभवाचा निश्‍चितच फायदा होणार आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली निवड ही भुषणावह बाब म्हणायला हवी.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!