पाण्याच्या ज्वलंत प्रश्नाला राजकीय वळण देऊ नका – नगराध्यक्ष करण पाटील

पारोळा प्रतिनिधी | शहरातील प्रत्येक नागरिकास व प्रत्येक घरास २४ तास पाणी देण्याचे आमचे स्वप्न आणि त्या कामाला ब्रेक लावू नका असे म्हणत या ज्वलंत प्रश्नाला आपण राजकीय वळण देऊ नका’ असे आवाहन नगराध्यक्ष करण पाटील यांनी विरोधकांना केले.

पाण्याच्या प्रश्नाविषयी बोलतांना नगराध्यक्ष करण पाटील म्हणाले की, “सध्या असलेला पाण्याचा प्लांट व पाइप लाईन हे जीर्ण झालेले आहेत. त्याच्या वाढीसाठी व नूतनीकरणासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. यात जलशुध्दीकरण केंद्र, पाइप लाईन, पाण्याच्या टाक्यासह विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यासाठी ४० ते ४२ कोटी निधीची आवश्यकता आहे. यासाठी प्रयत्नशील असून त्याची माहिती नगरपालिकेतर्फे संपूर्ण तपशीलासह मंत्रालयात सादर केली आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून निधी वाटप करण्यात आलेला नाही.

“निवडणुकीच्या तोंडावर सामान्य जनतेच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम शहरात सध्या सुरू असून शहरातील जीर्ण झालेली पाईपलाईन, जल शुद्धीकरण केंद्र हे घटक अगोदर बनविणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर पाण्याच्या टाकीचा विषय येईल” असे म्हणत “१ कोटीचा निधी आणून दररोज पाणी देण्याचे स्वप्न लोकांना दाखवून निवडणूकीच्या तोंडावर जुमलेबाजी करत पारोळा शहरवासीयांच्या या ज्वलंत प्रश्नाला आपण वेगळे राजकीय वळण देऊ नका” असे आवाहन नगराध्यक्ष करण पाटील यांनी विरोधकांना केले.

Protected Content