Home क्रीडा राजस्थान–हैदराबादमध्ये आज करो या मरोची लढत ; पराभूत संघाचा स्पर्धेला रामराम

राजस्थान–हैदराबादमध्ये आज करो या मरोची लढत ; पराभूत संघाचा स्पर्धेला रामराम


चंदीगड- वृत्तसेवा ।  आयपीएल  2026 च्या प्लेऑफमधील सर्वात महत्त्वाच्या सामन्यांपैकी एक असलेला एलिमिनेटर सामना आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. कारण आजच्या लढतीत जिंकणारा संघ पुढे क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश करणार असून पराभूत संघाला थेट स्पर्धेबाहेर जावे लागणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही ‘करो या मरो’ची लढत ठरणार आहे.

रियान परागच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स मैदानात उतरणार असून युवा खेळाडूंच्या जोरावर संघ मोठी कामगिरी करण्याच्या तयारीत आहे. राजस्थानच्या फलंदाजीची धुरा यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशीवर असेल. ध्रुव जुरेल, कर्णधार रियान पराग, दासुन शनाका आणि डोनोवन फरेरा हे मधल्या फळीत संघाला बळ देतील. तर वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर यांच्याकडून निर्णायक क्षणी प्रभावी मारा अपेक्षित आहे. युवा आणि अनुभवाचा समतोल साधलेल्या राजस्थानसमोर आज दबावाचे मोठे आव्हान असणार आहे.

दुसरीकडे पॅट कमिन्सच्या पुनरागमनानंतर सनरायझर्स हैदराबादने स्पर्धेत दमदार पुनरागमन केले आहे. हंगामाच्या सुरुवातीला काही सामने गमावल्यानंतर हैदराबादने दुसऱ्या टप्प्यात जबरदस्त लय पकडली. शेवटच्या सात सामन्यांपैकी पाच सामने जिंकत संघाने प्लेऑफचे तिकीट निश्चित केले. अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांची आक्रमक फलंदाजी हे हैदराबादचे सर्वात मोठे बलस्थान मानले जात आहे. गोलंदाजीत कर्णधार पॅट कमिन्स आणि हर्षल पटेल यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे.

हैदराबादसमोर राजस्थानचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी आणि जोफ्रा आर्चर हे मोठे आव्हान ठरणार आहेत. अवघ्या 15 व्या वर्षी वैभवने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पॉवरप्लेमध्ये मोठे फटके खेळण्याची त्याची क्षमता राजस्थानसाठी गेमचेंजर ठरू शकते. तर आर्चरच्या वेगवान आणि अचूक गोलंदाजीमुळे हैदराबादच्या आक्रमक फलंदाजांना सावध राहावे लागणार आहे.

आकडेवारी पाहिली तर सनरायझर्स हैदराबादचे पारडे जड दिसते. आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 23 सामने झाले असून त्यात हैदराबादने 14 सामने जिंकले आहेत, तर राजस्थानला 9 विजय मिळाले आहेत. विशेष म्हणजे चालू हंगामातील दोन्ही सामन्यांत हैदराबादने राजस्थानवर मात केली आहे. इतकेच नाही तर गेल्या पाचही सामन्यांत हैदराबादने राजस्थानवर वर्चस्व राखले आहे. त्यामुळे राजस्थानला आज केवळ प्रतिस्पर्ध्यांशीच नव्हे तर आकडेवारीशीही सामना करावा लागणार आहे.

प्लेऑफच्या इतिहासातही हे दोन संघ याआधी दोनदा समोरासमोर आले आहेत. 2024 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये हैदराबादने राजस्थानचा पराभव केला होता. तर 2013 मधील एलिमिनेटरमध्ये राजस्थानने हैदराबादवर चार विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघ जुन्या हिशेबांचीही बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.


Protected Content

Play sound