
भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी खास स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या वस्तू प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याला उत्साहात सुरुवात झाली. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या वतीने ब्राह्मण संघ येथे आयोजित या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे आणि शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत आज दुपारी १२ वाजता पार पडले. या कार्यक्रमाला महिला नगरसेविका, शहर व तालुक्यातील महिला आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
२०११ पासून प्रतिष्ठा महिला मंडळ स्थानिक महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कार्यरत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या कलागुणांना व व्यवसायिक क्षमतेला वाव मिळतो. यंदाही मंडळाने दिवाळीच्या निमित्ताने महिलांनी बनवलेल्या घरगुती, हस्तकला आणि साजेस्या वस्तूंच्या विक्रीसाठी हे प्रदर्शन आयोजित केले आहे.
प्रदर्शनात फुलवाती, मातीचे दिवे, आकर्षक तोरणे, पारंपरिक व आधुनिक कपडे, कॉस्मेटिक उत्पादने, घरसजावटीच्या वस्तू अशा अनेक वस्तूंचा समावेश असून, सर्व काही एका छताखाली ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. या प्रदर्शनात सहभागी महिलांनी स्वतःच्या हस्तकलेच्या वस्तूंना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.
या उपक्रमातून महिलांना आर्थिक पाठबळ मिळत असून, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आहे. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी, महिलांच्या मेहनतीला प्रोत्साहन द्यावे आणि त्यांचं स्वावलंबन सशक्त करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावे.
दिवाळीच्या खरेदीसाठी हे प्रदर्शन एक चांगला पर्याय ठरत असून, स्थानिक महिला उद्योजिकांना थेट मदत करण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे. भुसावळकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाला यशस्वी करावे, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.



