
भुसावळ-इकबाल खान । रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चौघा भावंडांच्या खून प्रकरणातील आरोपीला आज भुसावळ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांनी या प्रकरणात प्रभावी युक्तीवाद केला.

या संदर्भातील वृत्त असे की, रावेर तालुक्यातील बोरखेडा या गावात १५ ऑक्टोबर २०२० रोजी भयंकर हत्याकांड घडले होते. बोरखेडा गावात रोड नजीक असलेल्या मुस्तफा शेख यांच्या शेतात सालदार म्हणून महताब व रुमाल बाई भिलाला हे दाम्पत्य आपल्या पाच मुलांसह राहत होते, 15 तारखेला आपल्या मध्य प्रदेश येथील मूळ गावी गेले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 तारखेला सकाळी भिलाला कुटुंबातील मोठी मुलगी सईता 14, मुलगा रावल 11, अनिल 8, सुमन 3 ह्यांचे मृतदेह सकाळी शेतमालकाला रक्ताच्या थारोळ्यात दिसले. त्यांनी तत्काळ पोलिसांना ही माहिती दिली, पोलिसांनी तात्काळ परिसर सील करत तपास सुरू केला, त्यांना घटना स्थळी कुऱ्हाड भेटली होती. या हत्याकांडाने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून महेंद्र सिताराम बारेला या १९ वर्षाच्या तरूणाला अटक केली होती. त्याने आपल्या गुन्ह्याची कबूली दिली होती. हा खटला भुसावळ येथील न्यायालयात चालला. यात विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांनी खटला चालविला. कालच या खटल्याचा युक्तीवाद पूर्ण झाला होता. आज न्यायालयाने महेंद्र बारेला या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.



