Home Cities धरणगाव क्रांतिकारकांचे बलिदान हेच खरे स्वातंत्र्याचे अधिष्ठान – आचार्य अमोघकीर्तीजी महाराज

क्रांतिकारकांचे बलिदान हेच खरे स्वातंत्र्याचे अधिष्ठान – आचार्य अमोघकीर्तीजी महाराज

0
4


धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य जपणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे, असा प्रेरणादायी संदेश धर्मदिवाकर परमपूज्य १०८ आचार्य श्री अमोघकीर्तीजी महाराज यांनी धरणगाव येथे दिला. क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकास सदिच्छा भेट देत त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याला अभिवादन केले आणि राष्ट्रप्रेम, संस्कार व इतिहास जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

धरणगाव येथील क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकात आचार्य अमोघकीर्तीजी महाराज आणि परमपूज्य आचार्य श्री अमरकीर्तीजी महाराज यांचे आगमन झाले. या भेटीदरम्यान स्मारक परिसरात उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, आज आपण मुक्त भारतात श्वास घेत आहोत ते असंख्य ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या त्याग, संघर्ष आणि बलिदानामुळे शक्य झाले आहे. “राष्ट्र प्रथम ही भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात दृढ असली पाहिजे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

आचार्यश्रींनी यावेळी क्रांतिकारी खाज्याजी नाईक यांच्या ऐतिहासिक कार्याचा तसेच जनजाती समाजातील स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभा राहिलेला संघर्ष आणि राष्ट्रनिष्ठेची परंपरा ही आजच्या व पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी स्मारक संस्थेच्या सामाजिक व जनजागृतीपर कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी, क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्थेचे सचिव विलास महाजन, सहसचिव समाधान मोरे, पालक किशोर चौधरी तसेच संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यही या कार्यक्रमाला उपस्थित होते. याशिवाय श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राहुल जैन, पंचमंडळ सदस्य, मुनीश्रींचे वडील प्रा. ए. एम. जैन, त्यांच्या मातोश्री कणकमाला जैन, जैन समाजातील मान्यवर, श्रावक-श्राविका तसेच भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आचार्यश्रींच्या आगमनामुळे संपूर्ण स्मारक परिसरात भक्तिमय आणि राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.


Protected Content

Play sound