
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केलेल्या अतिवृष्टी व पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भातील शासन निर्णयात संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा समावेश न केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सादर केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, शासनाने जारी केलेल्या निर्णयामध्ये जळगाव जिल्ह्यातील केवळ काही निवडक तालुक्यांनाच मदतीच्या निकषात समाविष्ट केले आहे. प्रत्यक्षात गेल्या काही आठवड्यांतील अतिवृष्टी, नद्यांचे पूर आणि ढगफुटीमुळे संपूर्ण जिल्ह्याला जबरदस्त फटका बसला आहे. त्यामुळे निवेदनाद्वारे शासनाच्या निर्णयाचा आढावा घेऊन संपूर्ण जिल्ह्याचा समावेश करण्याची मागणी केली आहे.
कापूस, सोयाबीन, केळी, मुग, उडीद, ज्वारी, मका यांसारख्या प्रमुख पिकांचे उत्पादन अतिवृष्टीमुळे पूर्णतः ढासळले असून, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पिकांचे उरलेले अवशेषही वाचलेले नाहीत. काही ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे पुन्हा पेरणी करणेही अशक्य झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातून संपूर्ण वर्षाचे अर्थकारण बिघडले असून, अशा स्थितीत तात्काळ ठोस आर्थिक मदतीची गरज आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर जिल्ह्यातील अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या सह्या असून, या मध्ये प्रमोद पांडुरंग पाटील, भास्करराव राणे, कुलभूषण पाटील, भय्यासाहेब रवींद्र पाटील, एजाज मलिक, विकास पवार, अॅड. सचिन पाटील, रमेश भगवान पाटील, वाय. एस. महाजन, विश्वजित मनोहर पाटील, प्रा. एन. डी. पाटील (मा. सभापती), संगम पाटील, मजहर पठाण यांचा समावेश आहे.
या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी जळगाव यांना देखील पाठवण्यात आली असून, जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरूनही तात्काळ कार्यवाही व्हावी, अशी विनंती करण्यात आली आहे. शेतकरी संकटात असताना तांत्रिक निकषांमुळे मदतीपासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



