
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात अवर्षण आणि अतिवृष्टी या दुहेरी नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला असून, त्यामुळं मोठ्या प्रमाणावर पीक उत्पादनात घट झाली आहे. याअनुषंगाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात शासनाकडून तातडीची आपत्कालीन आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रमोद वामन धामोळे (तालुका शिवसेना अध्यक्ष) आणि डॉ. उद्धव पंढरीनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, जुलै अखेरपासून ऑगस्ट अखेरपर्यंत पावसाचा अभाव होता, तर सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या स्थितीत मक्याच्या पिकाची वाढ थांबली असून, आवश्यक त्या टप्प्यावर पाणी न मिळाल्याने दाणे भरलेच नाहीत. परिणामी उत्पादनात मोठी घट झाली आहे.
या समस्येचा फटका केवळ मका पिकालाच नव्हे तर कपाशीच्या उत्पादनालाही बसला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात फुलपात्यांची संख्या कमी राहिली आणि नंतरच्या अतिवृष्टीमुळे फुलपात्यांचा गळ होऊन कपाशीही उत्पादनापासून वंचित राहिली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नुकसानीचे स्वरूप हे इतके व्यापक आहे की अवर्षण की अतिवृष्टी याच्या निकषांपेक्षा शेवटी “उत्पादन घट” ही वस्तुस्थिती सरकारने लक्षात घ्यावी.
निवेदनात सरकारकडून केवळ तांत्रिक निकषांच्या आधारे मदतीचे निकष ठरवले जात असल्याने अनेक तालुके मदतीपासून वंचित राहतात, हेही स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे बोदवड तालुक्याला “अतिवृष्टी”च्या निकषांत बसवायचे की “अवर्षण”च्या, यावर वेळ न घालवता शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीचा विचार करून त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेल्या या निवेदनात शेतकऱ्यांच्या समस्या, उत्पादनातील घट, नैसर्गिक संकटांचे स्वरूप आणि भावनिक पीडा यांचा सविस्तर आढावा देण्यात आला आहे. शासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



