जिल्हा पोलिस अधिक्षकांकडून पारोळा पोलिसांचा गौरव


पारोळा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा पोलिसांनी बनावट अपघात प्रकरणाचा छडा लावत खून प्रकरणाचा पर्दाफाश केल्याने, त्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वरी रेड्डी यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आला.

अमळनेर उपविभागांतर्गत पारोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल अकस्मात मृत्यू क्र. ४०/२०२५ (BNS १९४) अंतर्गत सुरू असलेल्या प्रकरणाचा सखोल तपास करताना, पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, हेड कॉन्स्टेबल सुनील हाटकर, अभिजीत पाटील व अनिल राठोड यांनी मिळून अपघाताच्या बनावामागील खुनाचे धक्कादायक सत्य उजेडात आणले.

या प्रकरणात, विमा कंपनीकडून लाखो रुपयांची रक्कम, नवीन स्कूटी आणि घराच्या विम्याचा लाभ मिळवण्यासाठी बनावट अपघात दाखवण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र पोलिसांनी हुशारीने केलेल्या तपासातून या कटाचा भांडाफोड झाला आणि दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून खुनाची कबुली मिळवण्यात आली.

ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिसांच्या या चौकस तपासामुळे मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

या उत्कृष्ट तपासकार्याबद्दल संबंधित पोलिसांचा प्रशंसापत्र देऊन सन्मान करण्यात आला. स्थानिक नागरिकांनी देखील पारोळा पोलिसांचे भरभरून कौतुक केले आहे.