भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या अलीमको शिबिरात आज सकारात्मकतेचा आणि प्रेरणेचा संदेश देणारा उपक्रम पार पडला. “दिव्यांगत्व हे अडथळा नसून जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतीही उंची गाठता येते. शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असे प्रतिपादन आमदार किशोर पाटील यांनी करत विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगती करण्याचे आवाहन केले. पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.
समाजातील दिव्यांग विद्यार्थ्यांना सक्षम करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट, सी.पी. चेअर, व्हीलचेअर, कर्णयंत्र आदी साहित्य वितरित करण्यात आले. शासनाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होणार असून त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार किशोर पाटील यांच्यासह शिवसेना जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील, गटविकास अधिकारी बी. के. अंजने, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, भडगावच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखाताई मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, गटनेते लखीचंद पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी गणेश पाटील, नगरसेवक युवराज पाटील, समाधान पाटील, पुरुषोत्तम सोनवणे तसेच स्वीय सहाय्यक राजेंद्र पाटील आणि सुनील पाटील उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते हेलन केलर आणि लुईस ब्रेल यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.
दिव्यांग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार किशोर पाटील यांनी “दिव्यांगत्वावर मात करा, शिक्षण घ्या आणि यशस्वी व्हा. मतदारसंघाचा पालक म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी आहे,” असे आश्वासन दिले. त्यांच्या या शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून पालकांच्या चेहऱ्यावरही समाधान आणि आनंद दिसून आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन गणेश देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर पुजारी, लक्ष्मण खैरनार, टिकाराम पाटील, मनोहर माळी, मिलिंद सोनवणे, जितेंद्र माने, शिवाजी भोसले, वर्षा पाटील, छाया महाजन, छाया देसले आणि छाया ढोले यांनी विशेष परिश्रम घेतले.



