Home क्रीडा महिला टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा

महिला टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा


मुंबई-वृत्तसेवा । महिला क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली असून 12 जून 2026 पासून सुरू होणाऱ्या महिला टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अनुभवी फलंदाज हरमनप्रीत कौर हिच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे, तर आक्रमक आणि सातत्यपूर्ण फलंदाज स्मृती मानधना हिला उपकर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. भारताचा पहिला सामना 14 जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार असल्याने स्पर्धेची सुरुवातच उच्च दाबाच्या लढतीने होणार आहे.

घोषित करण्यात आलेल्या संघात अनुभव आणि युवा जोश यांचा संतुलित मिलाफ पाहायला मिळतो. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्यासोबत शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, श्रीचरणी, यास्तिका भाटिया, नंदिनी शर्मा, अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील आणि राधा यादव यांचा समावेश करण्यात आला आहे. संघरचनेत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात खोली दिसून येत असून, संघ व्यवस्थापनाने सर्व बाजूंनी तयारी केल्याचे संकेत मिळत आहेत.

महिला टी20 विश्वचषकाचा हा 10वा हंगाम असून यामध्ये एकूण 12 संघ विजेतेपदासाठी स्पर्धा करणार आहेत. या संघांना प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. भारताचा समावेश गट ‘अ’ मध्ये असून या गटात दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश, नेदरलँड्स आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. गट ‘ब’ मध्ये स्कॉटलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज, आयर्लंड, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. स्पर्धेत एकूण 33 सामने खेळवले जाणार असून अंतिम सामना 5 जुलै 2026 रोजी होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन इंग्लंड आणि वेल्स येथे करण्यात आले आहे.

भारतीय संघाचे वेळापत्रकही जाहीर झाले असून 14 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळल्यानंतर 17 जूनला नेदरलँड्स, 21 जूनला दक्षिण आफ्रिका, 25 जूनला बांगलादेश आणि 28 जूनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामने होणार आहेत. प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरणार असून उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे.

भारतीय महिला संघाने 2025 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकत ऐतिहासिक यश संपादन केले होते. आता टी20 विश्वचषक जिंकून दुहेरी यश मिळवण्याचे लक्ष्य संघासमोर आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने सहा वेळा टी20 विश्वचषक जिंकून वर्चस्व गाजवले आहे, तर इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांनी प्रत्येकी एकदा विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे या वेळी भारताकडून दमदार आव्हान अपेक्षित आहे.


Protected Content

Play sound