जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी परिसरात आज एका चटई बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले असून, आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट लांबूनच दिसून येत आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव एमआयडीसीतील ‘जे’ सेक्टरमध्ये असलेल्या एका चटई कंपनीला अचानक आग लागली. या आगीत कंपनीतील ज्वालाग्राही साहित्यामुळे आग वेगाने पसरली. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, कंपनीत असलेल्या गॅस सिलिंडरचे एकामागून एक तब्बल चार स्फोट झाले. या स्फोटांच्या आवाजा मुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून स्थानिक नागरिक आणि इतर कामगारांमध्ये भीतीचे प्रचंड वातावरण निर्माण झाले आहे.

आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे ही आग आता शेजारील ठिबक सिंचन साहित्य तयार करणाऱ्या कंपनीपर्यंत पोहोचली आहे. यामुळे शेजारील उद्योगांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. आगीमुळे परिसरात धुराचे काळे लोट पसरले असून श्वास घेण्यासही त्रास होत आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आगीचा विस्तार मोठा असल्याने हे बंब अपुरे पडत असल्याचे चित्र आहे. अग्निशमन दलाच्या गाड्यांमधील पाणी संपताच आगीने पुन्हा एकदा उचल खाल्ली, ज्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेसह इतर ठिकाणांहून अधिक मदतीची मागणी करण्यात आली आहे. आज शनिवार असल्यामुळे कामगारांना सुट्टी असल्यामुळे जीवित हानी टळली आहे.
ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असला तरी, अधिकृत तपासाअंतीच नेमकी माहिती समोर येईल. सध्या प्रशासनाचे आणि अग्निशमन दलाचे मुख्य लक्ष आग अधिक पसरू न देता ती पूर्णपणे विझवण्यावर आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप मिळालेले नाही.



