जिल्ह्यात १ ते ८ मार्च दरम्यान जंतनाशक मोहीम – डॉ. जमादार यांची माहिती

जळगाव प्रतिनिधी । १ ते १९ वयाच्या मुला-मुलींसाठी जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार असून ही मोहीम १ ते ८ मार्च दरम्यान जिल्ह्याभरात राबविण्यात येणार आहे. तसेच लहान बालकांपासून १९ वर्षाच्या तरुणांना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ११ लाख १७ हजार ८५० बालकांना जंतनाशक गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यात ग्रामीण ८ लाख ३६ हजार २९४, शहरी २ लाख ८१ हजार ५५६, महानगर पालिका क्षेत्रातील १ लाख ५० हजार बालकांना जंतनाशक गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका त्यांच्या हस्तेच जंतनाशक गोळ्या खाऊ घालणार आहे. 

जंतांमुळे बालकांमध्ये अशक्तपणा, चिडचिडेपणा, अभ्यासात लक्ष न देणे, रक्तक्षय आदी लक्षणे दिसतात. जंतनाशक गोळ्या खाऊ घातल्यास ही लक्षणे दूर होण्यास मदत होते. वर्षभरातून दोन वेळा जंतनाशक गोळ्या खाऊ घालण्यात येतात. १ ते २ वर्षाच्या बालकांना अर्धी, २ ते १९  वर्षाच्या बालकांना एक गोळी खायला देण्यात येणार आहे.

Protected Content