नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाणी काटकसरीने वापरा – नगराध्यक्षा

panipurawatha visalit

यावल प्रतिनिधी । हतनूर धरणात केवळ मृतसाठा शिल्लक असल्यामुळे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन मिळणार नसल्यामुळे, येथे शहरात १५ जून पर्यंत पाणीपुरवठा करता येईल, एवढा पाणीसाठा साठवण तलावात शिल्लक आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांनी केले आहे.

शहरात आगामी काळात पाणी टंचाई जाणवू नये यासाठी पालिका स्तरावर वेगवेगळे प्रयोग राबविले जात आहे. नागरिकांनी नळांना तोट्या बसवणे बाबत व पाण्याचा अपव्यय टाळण्या बाबतचे प्रबोधनात्मक प्रचार पत्रके पालिकेने शहरात वितरित केले आहेत. उद्या २० मे पासून शहरात पालिकेमार्फत विविध पथके निर्माण केली जात असून या पथकामार्फत शहरात पाण्याचा अपव्यय होत असलेल्या नळांची जोडणी कट केली जाणार असून संबंधित नळधारकाकडून 500 रुपये दंड वसूल करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान शहरात ज्या ठिकाणी पालिकेच्या जलवाहिन्या फुटलेल्या असतील त्या त्वरित बुजवण्यात याव्यात अशी नागरिकांची मागणी आहे. येथे चोपडा रोडवरील अक्सा नगरात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गेल्या तीन महिन्यांपासून फुटली असून यातून पाण्याचा अपव्यय होत असल्याबाबत जागरूक नागरिकांनी पालिकेत कळवून देखील पालिकेने अद्यापपावेतो जलवाहिनीची दुरुस्ती केली नसल्याचा आरोप अक्सा नगरातील नागरिकांनी केला आहे. येथील पालिका हतनूर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असून धरणाच्या उजव्या कालव्यातून सुटणारे पाणी पालिका साठवण तलावात साठवून ठेवत असते.

शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र हतनूर धरणात सध्या मृतसाठा शिल्लक असल्यामुळे आगामी काळात धरणातून पाण्याचे आवर्तन मिळणार नसल्यामुळे पालिकेने आगामी काळात शहरात पाणी समस्या उद्भवू नये, म्हणून नागरिकांना पाणी बचतीचे व पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच पालिकेच्या महादेव मंदिराजवळील विहिरी सह सानेगुरुजी माध्यमिक विद्यालयातील विहिरीचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात नेऊन तेथून शहरात पाणीपुरवठा केला जाणार आहे. शहरात सध्या 3 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे पालिकेचे साठवण तलावात साठवून ठेवलेल्या पाण्याचे वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होऊन त्यातील पाणी साठा बाष्पीभवनमुळे आटले जाते. अन्यथा किमान तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठी तलावात होऊ शकतो.

Add Comment

Protected Content