मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोदी सरकारवर टीका

 

मुंबई: वृत्तसंस्था । मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे, शिवाजी महाराज नसते, तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकला असता? एवढं जरी कळलं, तरी अभिजातच काय, सर्वोत्तम सर्वोच्च दर्जा देण्यासाठी एवढी एकच गोष्ट पुरे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली केली.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने विधानमंडळातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि मराठी भाषा विभाग, मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित परिसंवादाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. इंग्रजी आली पाहिजे, आम्हाला दुसऱ्या भाषेचा दुस्वास करायचा नाही पण त्यामुळे माझी भाषा कमकुवत होता कामा नये, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. वर्षामागून वर्ष जात आहेत. अजून मराठी भाषेला अभिजात भाषेची मान्यता मिळत नाहीये. गेल्या वर्षी मी उद्वेगाने म्हटलं, जे दिल्लीत दर्जा देणारे किंवा नाकारणारे बसले आहेत, त्यांच्या लक्षात एक गोष्ट आणून द्यायला हवी किंवा अगदी खडसावून सांगितलं पाहिजे, ही आमची मातृभाषा आहे व आम्हाला तिचा अभिमान आहेच, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मराठी भाषा दिन म्हटले की फक्त एकच दिवस मराठी भाषेचे प्रेम उचंबळून येणे चुकीचे. मराठी ही आपल्या रोमारोमात भिनलेलली भाषा आहे. माझी माती, माझी माता, माझी मातृभाषा हा आपल्यासाठी अभिमानाचा विषय असून हा गौरव जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या एका ध्येयाने एक होऊन पुढे जाऊ या, मग पाहू छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला, महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही? असा सवालही त्यांनी केला.

भाषा म्हणजे संस्कृती. संस्कृती म्हणजे भाषा. या दोन्ही गोष्टी एकमेकास पुरक आहेत. अनेकदा आजही आपण मराठीत बोलातांना लाजतो. आपण किती उच्चभ्रु आहोत दाखवायला बघतो आणि इंग्रजीत बोलतो. समोरच्या व्यक्तीने फाड फाड इंग्रजीत बोलले की आपण कमी पडतो… चीन, जपान मध्ये त्यांची भाषा ते ठामपणे आणि आत्मविश्वासाने बोलतात. काही ठिकाणी त्यामुळे आपल्याला अडचण येते. जगभरातील पर्यटक आपण आपल्याकडे आकर्षित करत असू तर इंग्रजी भाषेत बोलायला हरकत नाही. हे करतांना भाषेचा अभिमान असावा- दुराभिमान नको असे ही मुख्यमंत्री म्हणाले.

इतर देशाचे राष्ट्राध्यक्ष त्यांचे दुभाषी सोबत घेऊन फिरतात. आपल्या मातृभाषेत बोलणे त्यांना कमीपणा चे वाटत नाही. आपल्यातला हा न्युनगंड जात नाही तोपर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा च नाही कुठलाच गौरव मिळणार नाही. जो भाषा जपतो तो संस्कृती जपतो. या दोन्ही गोष्टी जपून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. त्या काळात मराठी भाषेत राजव्यवहार कोष तयार केला, असं ते म्हणाले.

मला येथे विचारायचे आहे की, आपल्याला आपल्या कारभारातील मराठी भाषा किती कळते? हे ही पहायला हवे. नस्तीवर सही झाली का, नियतव्यय म्हणजे काय, व्यपगत म्हणजे काय किती शब्द माहिती आहेत आपल्याला? मला इथे विचारायचे आहे की मग आपला मराठी भाषा कोश आपण साध्या सोप्या भाषेत का करू नये? सावरकरांनी मेयरला महापौरसारखे अनेक प्रती शब्द दिले. तसाच प्रयत्न आपण का करू नये, इथे केवळ भाषांतर करून उपयोग नाही तर त्या शब्दाचा अर्थ, संपूर्ण सार त्यात आला पाहिजे. त्यासाठी बोली भाषेची स्पर्धा घ्या ना, कोण नाही म्हणतोय, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी विधान परिषेदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई, संसदीय कार्य मंत्री अनिल परब, विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

परिसंवादात पहिल्या सत्रात “मराठी भाषेला अभिजात दर्जा” या विषयावरील परिसंवादात डॉ. विजया वाड, प्रा हरि नरके, प्रा. मिलिंद जोशी, विधानपरिषदेचे माजी सदस्य हेमंत टकले, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे तर दुसऱ्या सत्रात “आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी साहित्य प्रसार आणि प्रचार” या विषयावरील परिसंवादात मंदार जोगळेकर, प्रसाद मिरासदार, आनंद अवधानी, रश्मी पुराणिक, माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख आदी मान्यवर सहभागी होतील.

Protected Content