पक्षात जुन्या-नव्यांचा भेद करू नका ! : अजितदादा पवार ( व्हिडीओ )

भुसावळ, दत्तात्रय गुरव/संदीप होले | नाथाभाऊंमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी दाखल होत आहेत. मात्र यामुळे पक्षात जुन्या-नव्यांचा भेद न करता सर्वांनी एकत्रीतपणे पक्षाचे काम करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले. भुसावळ शहरातील विस्थापीत अतिक्रमणधारकांना हक्काचे घरकूल मिळण्यासाठी नगरपालिकेच्या अद्ययावत इमारतीसाठी निधी देण्याची मागणी सुध्दा राज्य सरकार मान्य करत असल्याची महत्वाची घोषणा त्यांनी केली. ते येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजीत राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते. याच कार्यक्रमात भुसावळातील नगरसेवकांसह परिसरातील पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार कैलास पाटील, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी आमदार मनीष जैन, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रारंभी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार्‍या मान्यवरांचा प्रवेश सोहळा पार पडला. माजी आमदार संतोष चौधरी यांनी आपल्या भाषणातून आपण आणि नाथाभाऊ हे एकत्र असल्याचे सांगून विरोधक अफवा पसरवण्याचे काम करत असल्याचा आरोप केला. शहरातील विस्थापीत अतिक्रमणधारकांना घरे आणि नगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी पाच कोटी रूपयांचा निधी हवा असल्याची मागणी त्यांनी केली. एकनाथराव खडसे यांनी आपल्या राष्ट्रवादीतील आगमनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेत पक्षात प्रवेश घेणार्‍यांचा ओढा वाढल्याचे नमूद केले. ते म्हणाले की, आज भुसावळ शहरात आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात जितक्यांचा प्रवेश झाला तितक्यांपेक्षा जास्त लोक लवकरच पक्षात येणार आहेत. यासाठी स्वतंत्र कार्यक्रम आयोजीत करावा लागेल. आजचा प्रवेश हा तर फक्त ट्रेलर असल्याच नाथाभाऊ म्हणाले.

अजित पवार यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्यांना स्पर्श केला. यात प्रामुख्याने त्यांनी जळगाव जिल्ह्यात कधी काळी आपले सहा आमदार निवडून येत असतांना आता सध्या आपले एकच आमदार असल्याबद्दल खंत व्यक्त केली. सर्वांनी एकत्रीतपणे प्रयत्न करून पक्षाला गतवैभव मिळवून द्यावे. जळगाव जिल्हा हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला करायचा असून यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन ना. पवार यांनी केले.

अजित पवार पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आत मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. विशेष करून नाथाभाऊंमुळे पक्षात येणार्‍यांचा ओघ वाढला आहे. यामुळे साहजीकच जुने आणि नवे असा वाद होण्याची शक्यता आहे. मात्र अशा कोणत्याही भेदाला थारा न देता सर्वांनी एकत्रीतपणे काम करावे अशी आवाहनवजा सूचना देखील त्यांनी केली. तर भुसावळच्या विकासासाठी आपण कटीबध्द असून नगरपालिकेच्या इमारतीसाठी निधी तर विस्थापीतांना घरकुले मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.

खालील व्हिडीओत पहा ना. अजितदादा पवार काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/278061834293132

Protected Content