पाळधी येथील अतिक्रमीत रस्त्याची तहसीलदारांकडून पाहणी

पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी । पाळधी बुद्रुक, तालुका धरणगाव येथील हायवे बायपासजवळील शंभर वर्षे जुन्या रस्त्यावर शैलेश कासट यांनी शेतात ये-जाण्यास अडथळे आणण्यासाठी खड्डे खोदण्यास सुरुवात केल्याने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व तहसीलदार यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. यासंदर्भात धरणगावचे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, शैलेश कासट यांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्या आईच्या नावे गट क्रमांक 111 खरेदी केला होता. या गटात त्यांनी प्लॉटिंग विकण्यास सुरुवात केली. परंतु याच शेतातून इतर शेतांमध्ये जाण्यासाठी अत्यंत जुना पारंपारिक वहिवाट रस्ता असतानादेखील श्री कासट यांनी खड्डे खोदून शेतकऱ्यांचा रस्ता बंद केला. याप्रसंगी स्थानिक शेतकरी देविदास पाटील यांच्यासह गोपाळ पाटील, योगेश बारी, अमोल पाटील, मच्छिंद्र पाटील, भरत पाटील यांनी कासट यांना जुने कागदपत्र दाखवून रस्ता बंद न करण्याची मागणी केली असता कासट यांनी नकार दिला. त्याचबरोबर ‘तुम्हाला जिथे जायचं असेल तिथं जा..  पण रस्ता मिळणार नाही’ अशी भाषा वापरली होती.

यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कासट यांचे संपूर्ण बांधकाम थांबवून कायदेशीर चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्याचप्रमाणे तहसीलदार यांना रीतसर तक्रार देऊन नगर रचना विभागामार्फत जागेची पूर्व तपासणी न करता परस्पर मंजुरी कशी दिली गेली, यासंदर्भात देखील तक्रार करण्यात आलेली असल्याने आज तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. संबंधितांना केंद्र सरकारच्या शेती वहिवाट कायद्यानुसार कोणत्याही शेतकर्‍याची पारंपरिक वाट अडवता येत नसल्याचे स्पष्ट करून लवकरच निकाल देणार असल्याचे सांगितले. तहसीलदारांनी रस्त्याची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधल्यामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!