चोपडा शहरासह परिसराच्या मातीला क्रांती, चळवळीचा सुगंध लाभला आहे. सर्वांगाने पुलकित झालेल्या या मातीत खेळण्याचे, बाळगण्याचं भाग्य लाभलेले अनेक जण आहेत. परंतू, त्यातही आपल्या निवडीच्या व आवडीच्या क्षेत्रात स्वत:ला वाहून घेणारी माणसे ही केवळ बोटावर मोजण्या इतकेच मिळातात. त्यातच शहरातील १९८३ ला वर्धा जिल्ह्यातून आलेले स्व.माजी शिक्षणमंत्री शिक्षणमहर्षी श्रीमती शरदचद्रिंका अक्का पाटील यांच्या संस्थेत नोकरीला लागणारे मेघराज बापूराव हांडे यांचा उल्लेख अधिक निवडकपणे करावा लागेल.
शिक्षक किती व्यासंगी असायला हवा, याच दर्शन मेघराज हांडे यांच्या कृतीतून हमखास होत असते. विज्ञान, तंत्रज्ञानाच्या युगात मार्ग दाखविणे व संगणक हे शिक्षकांचे मोठे स्पर्धक आहेत. अर्थात, या साधनांमुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासा ही जेट विमानाच्या वेगाने वाढत आहे. हाच वेग चिकित्सक, डोळस् नजरेने शिक्षकांनीही अपडेट राहायला हवेच, या विचाराने ते शैक्षणिक सेवेकडे पाहत होते. आपल्या वाट्याला एखादे अतिरिक्त काम आलेच तर ते त्याला कामाचे ओझे न समजत तर ते कार्यानंद म्हणून बघत होते. सांगण्याचं तात्पर्य एकच की, कार्यानंदातून माणसाला स्वत:च्या क्षमता सिद्ध करण्याची अनामिक संधी मिळते, या अलिखित नितीवचनावर त्यांचा विश्वास आहे.
मेघराज हांडे यांचे वडील बापूराव हांडे वर्धा जिल्ह्यात नगरपालिकेत साधे कामगार म्हणून नोकरीला होते. बापूराव यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यातच त्यांना ५ मुली, 1 मुलगा म्हणजेच मेघराज हांडे होय. परंतू मुलाला शिकवून एक दिवस मी त्याला साहेब बनवेल हे स्वप्न उराशी बाळगून होते. बघता – बघता मेघराज हांडे यांनी एम.कॉम.,एम.फील.चे शिक्षण पूर्ण करत असतांनाच ते नोकरीच्या शोधार्थ चोपडा शिक्षण मंडळाच्या काही जागा निघाल्या असल्याचे कळले. त्यांनी यासाठी फार्म ही भरला, त्यात हांडे यांचा नंबर लागला. मग यानंतर १९८३ पासून चोपडा शहरच यांची कर्मभूमी झाली. संस्कारीत जीवनाला खऱ्या अर्थाने आकार मिळायला सुरुवात झाली होती. मागील ३५ वर्ष ज्ञानदानाचे काम करत असतांना त्यांच्यात सत्त्वशीलता, ऋजुता, मोकळेपणा, स्वच्छ विनोदबुद्धी, विद्यार्थ्यांबद्दल जिव्हाळा, ज्ञान-पांडित्य मिरवण्याची आवड हे दुर्मिळ होत चाललेले गुण एकत्रित पहायचे असतील तर एकदा या माणसाला भेटलंच पाहिजे.
ज्ञानदानाच्या वेळेस राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या मार्गावर म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, करुणा, मैत्री, प्रज्ञा, मानवी मुल्य, विद्वानवाद या तत्त्वांचा पुरस्कर्ता मेघराज हांडेकर यांच्या कडे पाहिले जाते. या सर्व गुणांमुळेच हांडे हे मागील २५ वर्षापासून श्रीमती शरदचिंद्रका अक्का नागरी सह. पतसंस्थाचे ते संचालक आहेत. तसेच कॉमर्स व वाणिज्य व्यवस्थापन विभागाचे ते अनेक वर्षांपासून विभाग प्रमुख भूषविले आहेत. त्यांनी महाविद्यालयाचे उपप्राचार्य पदही आजमितीपर्यंत सांभाळले होते. यासर्व गुणांचा आधारावर ते फक्त शिक्षक म्हणून राहिले नाही. तर ते व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांमधील दुवा म्हणून राहिले.
शिस्तीचे वापरकर्ते असले तरी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आहेत. विद्यार्थ्यांना आपलेसे करत 1985 ते 1995 च्या दशकात वाणिज्य विभागात फक्त ४० ते ५० विद्यार्थी असणारे विभागात आजमितीला जवळपास १२०० विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यात मेघराज हांडे यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणूनच चोपडा शिक्षण मंडळाच्या संचालक मंडळाच्या निकटवर्तीय समजले जातात. संस्थेचे संस्थापक चेअरमन दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील, चेअरमन ॲड.संदीप भैय्या पाटील, सचिव डॉ.स्मिताताई पाटील, प्रा.डी.बी.देशमुख (भाऊसाहेब) यांच्यासह सर्व संचालक मंडळाचे मेघराज यांच्यावर अतुट विश्वास आहे. यांच्या ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत एकही शिक्षकाला, विद्यार्थ्यांला दुखविले नाही आहे.
मित्रांनो, आणखी एक उल्लेख असा की, अनेक जण अगदी चाकोरीबद्ध जीवन जगतात. आपली नोकरी, आपलं घर आणि आपण भले या कद्रू मानसिकतेतून अनेक जण बाहेरच पडत नाहीत. मात्र, मेघराज हांडे यांनी त्यास अपवाद आहे. समाजाचेही आपण काही देणे लागतो. या भावनेतून ते झेपावेल तेवढी कळत-नकळत पदरमोड करण्याचाही प्रयत्न करतात. त्यांचा तो स्थायीभाव आहे. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून ते ज्या विद्यार्थीला प्रवेश घेण्याची पैसे नसले तर ते आपल्या खिश्यातून होईल तितकी मदत करत असतात.
मेघराज यांच्यावर इतकीच जबाबदारी नव्हती तर ५ बहिणींचीही जबाबदारी होती. या सर्वांना शिक्षित उच्चशिक्षित करून त्यांचे लग्नसोहळा देखील करून देण्याची जबाबदारी यांच्यावर होती. त्यातही एक बहीण डोळ्यांनी अधू असल्याने देखील त्यांनी तिला शिक्षणासाठी प्रेरित करत तिला पदवीधर केले. संगीतात तिला निपुण केले आज त्या बहिणीच्या सुमधुर संगीताच्या माध्यमातूनच सरांचा निरोप समारंभ पूर्ण होणार आहे. आजच्या युगात प्रत्येक जण मी आणि माझा परिवार या चौकटीत अडकलेला असतो. परंतू हांडे यांनी आपल्या बहिणींची जबाबदारीसह आपल्या सासू – सासऱ्याची जबाबदारी निभवली. सरांची धर्मपत्नि मंदाकिनी हांडे ह्या माहेरी एकट्या असल्याने ही जबाबदारी त्यांनाच घ्यावी लागली. आणि फक्त जबाबदारी घेतली नाही तर आपल्याच कुटुंबातील सदस्य करून घेतले. मेघराज यांच्या संस्कारीत जीवनाला खऱ्या अर्थाने आकार मिळाला आहे तो पत्नी मंदाकिनी अन् मुलगा, आई-वडील, बहिणी, सासू-सासरे यांच्यासाठी वेळ देण्याचं जे नियोजन त्यांच्याकडून केले जाते. ती आजमितीला वर्तमानाची गरज आहे. मोबाइल, मनोरंजन वाहिन्यांच्या मायाजाळात अडकलेले सध्याच्या डिजीटल युगात आणि घरात एखादं अख्ख कुटुंब गप्पा मारतांना शोधूनही सापडणार नाही. अशी वस्तुस्थिती सध्दाला आहे. मात्र, मेघराज हांडे यांचं कुटुंब जेव्हा सुख-दु:खाच्या विषयावर हसत-खेळत चर्चा करतांना दिसते तेव्हा आधीचं विधान खोडण्याशिवाय पर्याय नसतो.
‘माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे’ या प्रार्थनेच्या ओळी गुण-गुणवत ते धन्यता मानत नाहीत. तर त्या कृतीत आणण्याचा पुरेपुर प्रयत्न करीत आहेत. आपले चोपडा शहर हे सांस्कृतिक व शैक्षणिक पंढरी व्हावे, या ध्येयाने समविचारी मित्रमंडळीच्या सोबतीने ते एकनिष्ठ भावनेने काम करीत राहिले. त्यांना ज्या शिक्षण विषयात रूची आहे, त्या संदर्भात ते अनेकांना मार्गदर्शन करण्याची भूमिका बजावतात. मात्र, हे सर्व करीत असतांना त्यांच्या चेहऱ्यावर कुठेच अहंकाराचा लवलेशही दिसत नाही. म्हणूनच तर त्यांनी आजमितीला जाते. लाखमोलाचा गोतावळा जमा केला आहे. तो भल्याभल्यांना हेवा वाटावा असाच आहे. त्यांच्या या कार्याला हत्तीचे बळ मिळो. त्यांच्या हातून जनकल्याणाची कामे होवोत, हेच निरोप समारंभ निमित्ताने आमच्या अक्षरशुभेच्छा !