बिबट्याला वाचविण्यात वनविभागाला यश

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । देऊळगावराजा तालुक्यातील खल्याळ गव्हाण येथील एका शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात वन विभागाला यश आले आहे.

खल्याळ गव्हाण येथील हद्दीत गेल्या काही बिबट्याने धूमाकूळ घातल्याने एकच खळबळ उडाली होती. ११ फेब्रुवारी रात्री बिबट्याने शेतातील गोठ्यासमोरील अंगणात बांधलेल्या गायीच्या वासरावर हल्ला करून त्याला ऊसात फरपटत नेऊन फस्त केली असल्याची घटना घडली होती पुन्हा १७ फेब्रुवारी रोजी बिबट्याच्या आगमनामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.. त्याला पकडण्यासाठी तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी करण्यात आली होती. बिबट्याने बाजूच्या उसाच्या शेतात शिरकाव केला असल्याची माहिती मिळाल्याने वनविभागाने ड्रोनद्वारे परिसराचे सर्वेक्षण केले. मात्र बिबट्या आढळून आला नाही.

परंतु ७ एप्रिल रोजी सुखदेव बनकर यांच्या विहिरीमध्ये बिबट्या पडला असल्याची माहिती ज्ञानेश्वर शेळके यांनी दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्यासाठी विहिरीमध्ये बाज सोडण्यात आली. त्यानंतर रेस्क्यू टीमला बोलाविण्यात आले. यावेळी त्याला बघण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर बिबट्याला अभयारण्यात सोडण्यात आले. बिबट्याला वाचवण्यासाठी विभागीय वन अधिकारी एस. एस. दुबे, वनविभागाने बिबट्याला आर. बी. पवार, बिलारी, एच. एच. पठाण, श्रीराम काकड, एस. डी. सानप, समाधान मांटे, संदीप मडावी, प्रवीण सोनवणे, दीपक गायकवाड, सागर भोसले, शेख समीर आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content