सुभाष चौक अर्बनमधील अपहार प्रकरणी होणार ‘टेस्ट ऑडिट’

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुभाष चौक अर्बन सहकारी पतसंस्थेमध्ये झालेल्या कथित २३ कोटी रूपयांच्या अपहार प्रकरणाची टेस्ट ऑडीटरची नियुक्ती करून चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सुभाष चौक नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये घोळ झाल्याचे प्रकरण गाजत आहे. याच्या अंतर्गत महावीर ज्वेलर्सचे संचालक अजय शांतीलाल ललवाणी यांनी जिल्हा उपनिबंधक जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार करून २३ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावाक करून चौकशीची मागणी केली होती.

अजय ललवाणी यांनी गेल्या काही वर्षात पतसंस्थेत बेनामी ठेवी व त्याचे वेगवेगळ्या नावाने रूपांतरण केलेले आहेत. त्या ठेवीदारांपैकी किती ठेवीदार हे टॅक्स भरणारे आहेत व त्यांच्याकडे हा प्रचंड पैसा कुठून आला व तो कुठल्या आधारे संस्थेत ठेवला त्याची चौकशी व्हावी. चेअरमन, त्यांच्या पत्नी, सख्खा भाऊ यांच्या पार्टनरशिप फर्ममध्ये पैसा कोणत्या नियमांच्या आधारे वर्ग केला यांचीही चौकशी करण्याची मागणीही केली होती.

या अनुषंगाने या कथित अपहार प्रकरणी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांनी पी. एफ. चव्हाण विशेष लेखा परिक्षक वर्ग -२ सहकारी संस्था, जळगाव यांची नियुक्ती करून संस्थेचे टेस्ट ऑडीट करून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Protected Content