आधीच वीज टंचाईचे सावट, त्यात भाववाढीची शक्यता

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे उर्जा निर्मितीच्या मागणीमुळे टंचाई व अर्थातच भारनियमानाचे सावट असतांना कोळश्याचे दर वाढल्याने विजेचे दर वाढण्याची शक्यता असल्याने राज्यातील वीज ग्राहकांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, सध्या कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे विजेची मागणी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. तसेच कोळशावर आधारित वीज खूप महागली असून यामुळे आता राज्यात वीज दरवाढ अटळ असून यासंबंधी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वितरण कंपन्यांना नव्या सूचना दिल्या आहेत.

वितरण कंपन्या वीजनिर्मिती प्रकल्पांकडून वीजखरेदी करून ती ग्राहकांना विक्री करतात. वीजनिर्मिती कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढला की ते वितरण कंपन्यांना महागड्या दराने वीज विक्री करतात. या स्थितीत वितरण कंपन्याही ग्राहकांकडून ‘इंधन समायोजन आकार’ म्हणून अतिरिक्त दराने वीजविक्री करतात. अशा या महागड्या विजेचा ग्राहकांवर ताण येऊ नये यासाठी वितरण कंपन्या निधी राखीव ठेवतात. परंतु मागील जवळपास वर्षभरात प्रामुख्याने कोळशावर आधारित वीज प्रचंड महागली. परिणामी वितरण कंपन्यांचा हा ‘इंधन समायोजन निधी’ आता संपला आहे. यामुळे विजेच्या दरात वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याआधी करोना संकटामुळे ग्राहकांकडून इंधन समायोजन आकार घेऊ नये, असे आयोगाने सर्व वीज वितरण कंपन्यांना सांगितले होते. १ एप्रिलपासून हा आकार घेण्याची मुभा कंपन्यांना होती. पण त्यापार्श्वभूमीवर नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, वीज वितरण कंपन्यांचा इंधन समायोजन निधी ज्या महिन्यात संपेल, तो पहिला महिना ग्राह्य धरला जाईल. त्यानंतर दोन महिन्यांपर्यंत हा आकार घेऊ नये. त्यानंतर पुढील तीन महिन्यांच्या देयकात तीन महिन्यांचा एकत्रित आकार घेतला जावा’, असे आयोगाने म्हटले आहे.

दरम्यान, राज्यभरात विजेची मागणी वाढलेली असताना औष्णिक वीजप्रकल्पांमध्ये भीषण कोळशाची टंचाई असल्याने लोडशेडींग होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोराडी वीजप्रकल्पात केवळ एक दिवसांचाच साठा आहे. त्यामुळे राज्यावर अंधाराचे गडद संकट दिसून येत आहे.

Protected Content