मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या उत्पादनात 40 टक्के वाढ

microsoft company

 

टोक्यो वृत्तसंस्था । ‘मायक्रोसॉफ्ट’ या जगप्रसिद्ध कंपनीने जपानमधील कर्मचाऱ्यांना चार दिवसांचा आठवडा लागू केल्यानंतर कंपनीची चांगलीच भरभराट झाली. प्रायोगिक तत्त्वावर 2 हजार 300 कर्मचाऱ्यांना दोन ऐवजी तीन दिवस सुट्टी दिल्यामुळे उत्पादकता तब्बल 40 टक्क्यांनी वाढली.

शनिवार रविवार सुट्टी अर्थात पाच दिवसांचा आठवडा, हे प्रत्येक कर्मचाऱ्याचं स्वप्न असतं. वर्क प्रेशरच्या नावाखाली अनेक जणांचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरत नाही. मात्र ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीने जपानमधील कर्मचाऱ्यांना एक पाऊल पुढे जात चार दिवसांचा आठवडा करुन दिला. म्हणजे शनिवार-रविवारला जोडून शुक्रवारीही हक्काची साप्ताहिक रजा मिळणार आहे. ‘वर्क लाईफ चॉइस चॅलेंज समर 2019’ अंतर्गत हा प्रयोग करण्यात आला होता. यानुसार कंपनीतील 2 हजार 300 कर्मचाऱ्यांना आठवड्यात तीन दिवस साप्ताहिक सुट्टी देण्यात आली. म्हणजेच या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून केवळ चारच दिवस काम करावं लागलं.

आता, इतकी सुट्टी मिळते म्हटल्यावर कर्मचारी तर खुश होणारच ना. प्रयोगाच्या कालावधीत कुठल्याच कर्मचाऱ्याला अतिरिक्त सुट्टी घेण्याची गरज भासली नाही. सर्वांनी चार दिवस मन लावून जास्तच काम केलं. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीने जपानमध्ये केलेल्या या प्रयोगाचा फायदा झाला. तीन दिवस सुट्टी दिल्यानंतरही कंपनीच्या उत्पादकता 39.9 टक्के वाढली.

Protected Content