रावेरात द्रवरूप तुरटीपासून बनवलेल्या मूर्तींमुळे गणेशोत्सव होणार पर्यावरणपूरक

ganesh murti

रावेर, प्रतिनिधी | द्रवरूप तुरटीपासून पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्ती घडवण्याचा प्रयोग भुसावळ येथील उद्योजक रामकृष्ण ढाके यांनी यशस्वी केला आहे. तुरटीपासून साकारलेल्या गणेशमूर्तीच्या विसर्जनानंतर पाण्याचे प्रदूषण तर होणार नाहीच, पण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींमुळे होणारे प्रदूषणही रोखण्यास त्यामुळे मदत होणार आहे.

 

रावेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या संकल्पनेला ढाके यांनी मूर्त स्वरूप दिले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी यंदाच्या गणेशोत्सवात रावेर नगरपालिकेच्या वतीने तुरटीच्या ५० मूर्ती मोठ्या गणेश मंडळांना मोफत पुरवण्यात येणार आहेत. मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या संकल्पनेतील तुरटीची गणेशमूर्ती घडवण्यासाठी नगरपालिकेचे तुरटी पुरवठादार रामकृष्ण ढाके यांनी प्रयत्न केले.

ढाके जळगाव येथील रहिवासी असून भुसावळ येथे त्यांचा ‘डॉल्फिन केमिकल्स’ हा कारखाना आहे. त्यांना गणेशमूर्ती घडविण्याचा यापूर्वी कोणताही अनुभव नव्हता, मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत त्यांनी तुरटीपासून गणेशमूर्ती साकारली आहे. तुरटीची गणेशमूर्ती ही सोपी बाब नव्हती. द्रवरूप तुरटीचे तापमान खूप जास्त असते. त्यामुळे ते थंड होण्यास व एक मूर्ती तयार होण्यास पाच ते सहा तास लागतात. याउलट प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती त्याचे रसायन साच्यात ओतल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात मूर्ती तयार होते. एकदा रबरी साचा घेतला की, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असंख्य मूर्ती त्यातून घडवता येतात. मात्र, द्रवरूप तुरटीच्या तीन-चार मूर्तीच एका साच्यातून घडवता येतात. तो साचा द्रवरूप तुरटीच्या उष्णतेमुळे निरुपयोगी होतो. अशा प्रतिकूल परिस्थितीतही ढाके यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे.

रावेर शहरातील मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांना यावर्षी नगरपालिकेच्या वतीने तुरटीपासून बनवलेल्या गणेशमूर्ती मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. रावेर नगरपालिका ही द्रवरूप तुरटी उपलब्ध करून देणार आहे. यामुळे गणेशोत्सवाचे पावित्र्य तर जपले जाईलच शिवाय पर्यावरणपूरक गणेशोत्सवही साजरा होईल. गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांनी अशा प्रकारच्या मूर्ती बनवण्यासाठी स्वत:हून पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.

Protected Content