Home Cities अमळनेर अमळनेर- जळोद बस सुरू करण्याची मागणी 

अमळनेर- जळोद बस सुरू करण्याची मागणी 


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील अमळगाव गांधीली येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना बससेवेअभावी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आगर प्रमुखांना निवेदन देत तातडीने अमळनेर ते जळोद बस सुरू करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना वाहतुकीच्या समस्येमुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला.

अमळगाव गांधीली परिसरातील विद्यार्थ्यांना दररोज शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी नियमित बससेवेचा आधार घ्यावा लागतो. मात्र, लासूर बस या गावात थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचणे अशक्य होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना उशीर होणे, तर काहींना परीक्षा चुकण्याची वेळ येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या समस्येमुळे पालकांमध्येही नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आगर प्रमुखांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यात अमळनेर ते जळोद दरम्यान सकाळी ८ वाजता विशेष बस सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी तालुका अध्यक्ष संदीप पाटील (काटे), शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, शहर उपाध्यक्ष महेश सुतार, तालुका उपाध्यक्ष निलेश चौधरी, तालुका सचिव निलेश भावसार, शहर उपाध्यक्ष आदित्य दोरकर, शहर उपाध्यक्ष जय बोरसे तसेच मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, बससेवा नियमित करण्याची मागणी आता अधिक तीव्र होत असून, प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound