मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिक्षण क्षेत्रात आपल्या ज्ञानाने आणि समर्पणाने नवी ओळख निर्माण करणाऱ्या मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूल ज्युनियर कॉलेजच्या दोन शिक्षकांनी राज्यस्तरावर तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे. मलकापूर येथे संपन्न झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात श्री. कपिल विलास जंगले आणि श्री. संजय ठाकूर या दोघांना प्रतिष्ठित “पद्म रत्न विद्या अवॉर्ड २०२६” देऊन गौरविण्यात आले.
मलकापूर येथील पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग कॉलेज आणि ‘तरुणाई’ करिअर मार्गदर्शक पत्रिका यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन या दोन्ही शिक्षकांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

हा सन्मान माजी मंत्री प्रा. लक्ष्मणरावजी ढोबळे आणि डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे स्थान सर्वोच्च असून, अशा पुरस्कारांमुळे कार्य करण्याची ऊर्जा मिळते, असे गौरवपूर्ण उद्गार मान्यवरांनी यावेळी काढले.
या ऐतिहासिक यशाबद्दल संस्थेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे, उपाध्यक्ष नारायण चौधरी, सचिव डॉ. सी. एस. चौधरी, प्राचार्य व्ही. एम. चौधरी आणि सर्व संचालक मंडळाने दोन्ही शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले आहे. या पुरस्कारामुळे शाळेच्या आणि परिसराच्या वैभवात भर पडली असून, सर्व स्तरांतून कपिल जंगले आणि संजय ठाकूर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



