जळगाव-विशेष प्रतिनिधी । राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच दारूबंदी खात्यातील बेबंदशाही आणि भ्रष्ट कारभाराबाबत थेट या खात्याच्या मंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तर, विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार या तक्रारीपेक्षा देखील हा विषय गंभीर असल्याने याबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात येत आहे.
राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या मंत्री सुनेत्राताई पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन देऊन प्रकृतीला अत्यंत अपायकारक असलेल्या अवैध दारूविक्रीची तक्रार केली आहे. यात प्रामुख्याने जिल्ह्यात गावोगावी विकल्या जाणाऱ्या पन्ना/फुगा दारूच्यी खुलेआम विक्री केली जात असून यात अनेकांचे जीव गेल्याचे नमूद करत याच्या चौकशीची मागणी केली आहे.

उमेश नेमाडे यांनी केलेली तक्रार ही गंभीर असली तरी यापेक्षा कितीतरी पटीने भयंकर प्रकार जळगाव जिल्हा राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कारभारातून घडत असल्याची बाब उघड असून याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. या खात्याचे प्रमुख जिल्हा अधिक्षक असून त्यांच्या सोबतीला चार विभागीय निरिक्षक आणि एक फिरत्या पथकाचे प्रमुख असे एकूण पाच निरिक्षक आहेत. हे पाच निरिक्षक आणि यांच्या हाताखालील कर्मचारी हे मिळून एक मोठे सिंडीकेट चालवत रग्गड पैसे कमावत असल्याची बाब सर्वांना ज्ञात आहे.
यात प्रामुख्याने बहुतांश हॉटेल्स, परमीट रूम्स व बियरबार आदींकडून कारवाईच्या नावाखाली दरमहा हप्ता उकळण्यात येत असतो. याला नकार देणाऱ्यांवर वारंवार कारवाई करण्यात येते. जळगाव एमआयडीसीच्या क्षेत्रात असलेल्या एका व्यापारी अल्पसंख्य समुदायातील व्यावसायिकाला अखेर हॉटेल बंद पाडण्यास भाग पाडण्यात आले आहे. याच्या जोडीला जिल्हाभरातील ढाबे आणि बऱ्याच हॉटेल्सवर अवैध दारूची सर्रास विक्री करण्यात येत असून यातून देखील मोठा आर्थिक मलीदा लाटण्यात येत असतो. तर, यात देखील हप्ता न देणाऱ्याला जाणीवपूर्वक टार्गेट करून त्याला व्यवसाय बंद पाडण्यात भाग पाडले जाते. यात फिरत्या पथकाचा मोठा हातभार आहे.
खरं तर या पथकाकडून अवैध दारूविक्रीवर प्रतिबंध करण्याची अपेक्षा असतांना त्यांच्याकडूनच याला प्रोत्साहन दिले जात ही बाब दुर्दैवी होय. अनेकदा कागदोपत्री तकलादू कारवाई करण्याचे नाटक देखील त्यांच्याकडूनच वठविण्यात येत असल्याची बाब देखील लक्षणीय होय. या सर्व प्रकारावर अनेक सामाजिक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात असून येत्या काही दिवसात जनभावना अजून तीव्र होण्याचे संकेत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील अवैध दारूविक्री आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या भ्रष्ट कारभाराची अनेक उदाहरणे हे पुराव्यांसकट आमच्या हाती असून या माध्यमातून या खात्याच्या भयंकर भ्रष्टाचाराचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत. तर या प्रकरणात उच्च स्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेने केली असून आम्ही नागरिकांच्या सोबत आहोत.



