


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करून प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरळीत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती व विद्यार्थी विभागाने शिक्षण विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. शाळा व महाविद्यालय स्तरावर होणारा संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी महाविद्यालयनिहाय झोनल ऑफिसर नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेसाठी सुसूत्रता आणि काटेकोर धोरण राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी शिक्षण सहसंचालक कार्यालयाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश कार्यक्रम संयोजक तथा रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षा भाग्यश्री विवेक ठाकरे, जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्षा मोनालिका पवार आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने १५ जून रोजी उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. पराग मसराम तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी शासनाने निश्चित केलेल्या पारदर्शक व सुलभ प्रवेश धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी निवेदन देण्यात आले. प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाने महाविद्यालयनिहाय नियोजन करावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनाच्या ४ जानेवारी २०१६ रोजीच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला आणि गुणपत्रिका देताना कोणतेही शुल्क आकारता येणार नाही. मात्र, जिल्ह्यातील काही संस्थांकडून विद्यार्थ्यांकडून २०० ते ५०० रुपये शुल्क घेतले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारची बेकायदेशीर वसुली तात्काळ थांबविण्यासाठी सर्व संस्थांना स्पष्ट आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. तसेच शासनाच्या ८ जुलै २०२४ रोजीच्या निर्णयानुसार आर्थिक दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवेशाच्या वेळी संबंधित विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क आकारून त्यांना अडचणीत आणू नये, अशी मागणी करण्यात आली.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मुलींना सरसकट मोफत प्रवेश मिळण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयासाठी नोडल ऑफिसर नियुक्त करण्याची मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसने केली आहे. तसेच नियुक्त करण्यात आलेल्या झोनल ऑफिसरची महाविद्यालयनिहाय माहिती विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सार्वजनिक करण्यात यावी, अशी मागणी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. या बैठकीत सकलीन शेख रफिक, प्रांजल सुनील सोनार, श्रद्धा छगन सोनवणे, मानसी भास्कर ठाकरे, प्रिन्सी राकेश दारा, कीर्ती अरुण कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थ्यांचा सहभाग होता. शिक्षण विभागाच्या दोन्ही कार्यालयांच्या प्रमुखांशी चर्चा करून प्रवेश प्रक्रियेतील अडचणी सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.



