मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सत्तेसाठी सुरू असलेल्या राजकीय हालचालींवर निशाणा साधताना पटोले यांनी हे ‘ऑपरेशन टायगर’ नसून ‘ऑपरेशन गिधाड’ असल्याची टीका केली आहे.
नाना पटोले म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत जनता एखाद्या पक्षाला मतदान करून सत्ता देते. मात्र, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना इतर पक्षांतून फोडून आपल्या बाजूने वळवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्तेची इच्छा असणे चुकीचे नाही, मात्र सत्तेची भूक इतकी वाढली आहे की लोकशाही व्यवस्थेलाच धोका निर्माण झाला आहे, असे पटोले म्हणाले.

लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत पटोले यांनी स्पीकरही मोदी-शहा यांच्या सांगण्यावरून निर्णय घेत असल्याचा आरोप केला. सत्तेचा वापर करून विरोधी पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पटोलेंचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. ठाकरे गटातील खासदार फुटणार असल्याच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही खासदारांना पक्ष सोडण्यासाठी मोठ्या आर्थिक ऑफर दिल्या जात असल्याचा दावा केला होता. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, “ते यापेक्षाही अधिक पैसे देऊ शकतात. कारण या लोकांनी देश लुटला आहे.”
भाजपवर टीका करताना त्यांनी लोकशाही व्यवस्थेची हत्या होत असल्याचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आघाडीच्या राजकारणाचा काँग्रेसकडून तीव्र निषेध करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. “बावनकुळे यांना सर्व माहिती आहे. मात्र ते त्याबाबत बोलत नाहीत. त्यांनी जर सत्य बोलण्यास सुरुवात केली तर त्यांची खुर्ची टिकणार नाही,” असा दावा पटोले यांनी केला.
2022 मध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या घटनेचा संदर्भ देत पटोले यांनी भाजपवर आरोप केले. सरकार पाडण्याच्या हालचालींमध्ये भाजपचा सहभाग नसल्याचे देवेंद्र फडणवीस सांगत होते, मात्र नंतर काही घटनांमधून वेगळे चित्र समोर आले, असा दावा त्यांनी केला. अमृता फडणवीस यांनी त्या काळातील काही राजकीय घडामोडींबाबत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत पटोले यांनी फडणवीसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
उद्धव ठाकरे गटातील खासदारांबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटाने आपल्या खासदारांना दिल्लीतील बैठकीसाठी बोलावले असून पक्षाची संसदेतील अधिकृत ओळख कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस, ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील नेते भाजप आणि शिंदे गटावर टीका करत आहेत. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना भाजपचा या घडामोडींशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मजबूत सरकार असून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले. संजय राऊत यांनी खासदारांना 15 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा केलेला दावा बिनबुडाचा असल्याचेही त्यांनी म्हटले



