


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात तब्बल ४ कोटी ८५ लाख ३ हजार ५८२ रुपयांच्या आर्थिक अपहार व फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, जळगाव या संस्थेअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप करत माजी राज्यमंत्री गुलाबराव बाबुराव देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये लोकेश उर्फ चेतन गणेश कोल्हे (रा. नशिराबाद, ता. जि. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. फिर्यादी गुलाबराव देवकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १ ऑगस्ट २०२० ते ३१ मे २०२३ या कालावधीत आरोपी लोकेश कोल्हे याने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, जळगाव या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमधील आर्थिक व्यवहारांमध्ये एकूण ४ कोटी ८५ लाख ३ हजार ५८२ रुपयांचा अपहार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच संस्थेची फसवणूक केल्याचे नमूद करण्यात आले असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हा दिनांक १६ जून २०२६ रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन अव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्यासह संबंधित अधिकारी तपास प्रक्रियेत सहभागी आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन अव्हाड व महिला पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे यांच्या देखरेखीखाली पुढील चौकशी सुरू आहे.



