जळगावात बांधकामासाठी विमान प्राधिकरण ना हरकत दाखल्याची अट हटवण्याची मागणी

जळगाव (प्रतिनिधी) शहरात बांधकामासाठी विमान प्राधिकरणाचा दाखला अत्यावश्यक करण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेची जी ससेहोलपट होत आहे, ती तात्काळ थांबवावी अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाने महानगपालिका आयुक्तांकडे केली आहे.

 

building

या संदर्भात आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या शहरातील विमानतळ हे महानगरपालिका हद्दीपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असून शहराच्या दुसऱ्या टोकापासून सुमारे १० किलोमीटरवर आहे. विमान प्राधिकरणाच्या प्रचलित निकषानुसार धावपट्टीच्या सरळ रेषेत जरी आपले शहर असले तरी आपल्या शहरातील प्रचलित नियमानुसार मंजूर असलेल्या जास्तीत जास्त उंचीच्या इमारतीपेक्षा ती लिमिट फार जास्त असेल. तसेच अशा प्रकारच्या परवानगीमुळे वैयक्तिक घरांना किंवा अफोर्डेबल हाऊसिंग या प्रकारातील घरे बांधतांना मोठी अडचण होत आहे. सदर परवानगीची गरज ही गगनचुंबी इमारतींना व आवश्यकतेनुसार असल्यास २५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींना लागू केल्यास शहरातील सर्वसामान्य जनतेची मोठ्या जाचातून सुटका होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अनाठाई ना हरकत दाखल्यापासून शहरवासीयांची सुटका करावी व विमान प्राधिकरणाची योग्य ती चर्चा करून त्यासाठी निकष ठरवून घ्यावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. हे निवेदन सचिन धांडे , मुकुंद सपकाळे, पियूष पाटील, सिद्धार्थ तायडे, अशफ़ाक पिंजारी, विनोद देशमुख, सूरज पाटील, प्रतिभा शिंदे यांनी नागरिकांच्या वतीने दिले आहे.

Add Comment

Protected Content