बोदवड येथे पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी

bodvad nivedan

बोदवड, प्रतिनिधी | परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत पिकांचे त्वरित पंचनामे करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन आज (दि.३१) तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथील नायब तहसीलदार दीपक पुष्कर यांना दिले आहे.

 

या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात परतीच्या पावसामुळे काढणीला आलेली ज्वारी, कापूस, सोयाबीन, मका, कांदा व भुइमुग या पिकांचे संपुर्ण नुकसान झालेले आहे. त्याचे महसुल यंत्रणेमार्फत आकलन करून नुकसान भरपाईचा प्रस्ताव राज्य सरकारकडे त्वरीत पाठवावा. सोबतच सरकारने २०१४ पासून वीजबिल माफीबाबत दुर्लक्ष केले आहे, ते त्वरीत माफ करावे. आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे पुरवावे. पिक विमा योजनेतील उणिवांमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, त्यामुळे सदर नुकसान भरपाई विमा संरक्षित रकमेएवढी असावी. तालुक्यात विमा कंपनीचे प्रतिनिधी नसल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत, त्यावर त्वरित पर्याय काढावा. नुकसानीच्या आकलनासाठी पंचनाम्यांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण करावे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आठवडा भरात अदा होण्यासाठी युद्धपातळीवर कामकाज करावे, जर आठ दिवसात नुकसान झालेल्या पिकाचे पचंनामे करण्यात टाळाटाळ केल्यास शेतकरी संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आलेला आहे.

निवेदन देताना जिल्हाध्यक्ष दगडू शेळके, जिल्हा युवा आघाडी प्रमुख ईश्वर लिधुरे, तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, शहर अध्यक्ष राहूल वाघ, प्रसिद्धी प्रमुख नाना पाटील, सागर कुकडे, विशाल तांगडे, अनंत वाघ, प्रविण मोरे, तुकाराम माळी, जगन्नाथ शेळके, जिवन राणे, संतोष पाटील, शंकर तेली, रामा तुरे, योगेश शेळके, संजय नेरकर, शांताराम बोरसे, शिवाजी घडेकर, ता.उपाध्यक्ष संतोष पाटील यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

 

Protected Content