तिसऱ्या रेल्वे लाईनच्या कामामुळे ९ गावांचा संपर्क तुटणार !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रेल्वे प्रशासनाने मुंबई-भुसावळ दरम्यानच्या तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम हाती घेतले आहे. दरम्यान पाचोरा शहरात देखील रेल्वे लाईनचे काम हाती घेतले आहे. रेल्वे लाईनचे काम सुरू झाल्यानंतर पाचोरा तालुक्यातील ९ गावांचा संपर्क तुटणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करून देण्यात यावी या मागणीसाठी आमदार किशोर पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी पाचोरा प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांची भेट घेवून निवेदन देण्यात आले.

पाचोरा ते तारखेडा दरम्यान रेल्वे प्रशासनाने तिसरी रेल्वेलाईन टाकण्याचे काम हाती घेतले असून सदरील कामामुळे रेल्वे लगतचा पुर्वापार शिवकालीन रस्ता बंद करण्यात येणार असल्याचे समजते आणि सदरील रस्ता बंद झाल्यास तारखेडा बु”, तारखेडा खु”, चिंचखेडा, गाळण (हनुमानवाडी), गाळण बु”, गाळण खु”, गाळण (विष्णुनगर), चुंचाळे, नगरदेवळा इत्यादी गावांचा संपर्क तुटुन तालुक्याच्या गावाला गाव जोड रस्ताच बंद होत असल्यामुळे सदरील गावांचा दळणवळणाचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. तसेच आरोग्याच्या दृष्टीने तालुक्याला पोहचण्यास अडचणींचा सामना करावा लागणार आहे. आणि यामुळे भविष्यात आरोग्य सेवा वेळेत न मिळाल्यास जिवीत हानी सुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळकरी मुला – मुलींचा प्रश्न खूप मोठा आहे. वरीलप्रमाणे ९ गावांमधून बहुसंख्य मुले – मुली पाचोरा येथे शिक्षण घेण्यासाठी याच रस्त्याचा वापर करीत आहेत. आणि हा रस्ता बंद झाल्यास या बहुसंख्य मुला – मुलींचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे. या गावातील ग्रामस्थांचे नुकसान होवु नये या रास्त मागणीचे निवेदन पाचोरा – तारखेडा – गाळण (शिवकालीन) रस्ता संघर्ष समिती, गाळण ता. पाचोरा यांचेतर्फे आज दि. १२ सप्टेंबर रोजी पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना देण्यात आले. निवेदन देते प्रसंगी तहसिलदार कैलास चावडे, निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, सेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख सुनिल पाटील, अनिल धना पाटील, प्रविण ब्राह्मणे, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील सह विविध गावचे सरपंच, ग्रा. पं. सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वरील सर्व गावांमधून दररोज हजारो लिटर दुध हे तालुक्याला आणावे लागते तसेच शेतकऱ्यांना‌ त्यांचा शेतमाल सुध्दा पाचोरा येथे आणण्यासाठी खुप मोठी गैरसोय होणार आहे. शेतकरी आधीच ओल्या दुष्काळाने त्रस्त झाला आहे आणि त्याचा शेतमाल विक्रीसाठी नेण्यास रस्ता नसेल तर बळीराज्याची खुप मोठी गैरसोय घेणार आहे. या सर्व गावातील विद्यार्थी, शासकिय, निमशासकिय कर्मचारी तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी विविध कामकाजासाठी येण्यासाठी याच रस्त्याचा वापर करीत असतात. त्यांची सुध्दा मोठी गैरसोय होणार आहे. पाचोरा – तारखेडा – गाळण (रेल्वे लगतचा शिवकालीन) रस्ता बंद झाल्यास अशा अनेक समस्या‌ आम्हा ९ गावातील ग्रामस्थाना सामोरे जावे लागणार आहे आणि यासोबतच हजारो विद्यार्थी आणि ९ गावातील जवळपास २० हजार लोकांचा दळणवळणाच्या दृष्टीने तालुक्याचा संपर्क दुरावणार आहे. सर्व ९ गावांचे रहिवासी यांच्या वतीने पाचोरा – तारखेडा (शिवकालीन) रस्ता संघर्ष समितीतर्फे मागणी करत समस्यांचा सारासार विचार करून सदरची मागणी संबंधीत विभागास कळवुन रेल्वे रूळालगतच नवीन जमिन अधिग्रहण करून पर्यायी रस्त्याची तात्काळ व्यवस्था करावी आणि शासन दरबारी न्याय मिळावा अशी मागणी सर्व ९ गावांच्या ग्रामस्थांनी केली असून लवकरात लवकर‌ शासनाकडून ठोस लेखी आश्वासन मिळावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले असुन निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई – ३२, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई, जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार, आमदार (पाचोरा) यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Protected Content