सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील कोचुर खुर्दच्या माजी सरपंच ज्योती संतोष कोळी यांनी सादर केलेला टोकरे कोळी जातीचा दाखला बोगस असल्याचा आरोप करत तो जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. कोचुर खुर्द ग्रामपंचायत सदस्या लिलाबाई घनश्याम तायडे यांनी सह आयुक्त तथा उपाध्यक्ष दक्षता पथक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, धुळे यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे.
२०२३ मध्ये कोचुर खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ज्योती कोळी अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडून आल्या होत्या. त्यांनी निवडणुकीवेळी एक वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते. मात्र, मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्च रोजी त्यांना सरपंचपदावरून अपात्र ठरवले.
लिलाबाई तायडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ज्योती कोळी यांनी १० एप्रिल १९९५ रोजी तत्कालीन तहसीलदार, जळगाव यांच्याकडून टोकरे कोळी जातीचा दाखला मिळवला आहे. याबाबत माहिती अधिकारात तहसीलदारांकडून माहिती मागितली असता, ज्योती कोळी नावाने टोकरे कोळी जातीचा दाखला जारी केल्याची नोंद नसल्याचे स्पष्टपणे कळविण्यात आले आहे. या माहितीमुळे त्यांचा जातीचा दाखला बोगस असल्याचे सिद्ध होत असल्याने तो जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. या प्रकरणी तक्रारदार लिलाबाई तायडे यांच्या वतीने ॲड. विश्वासराव भोसले, जळगाव हे कामकाज पाहत आहेत. आता धुळे येथील समिती या तक्रारीवर काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.