जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२५ ची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून, प्रशासनाकडून शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा आणि मार्गदर्शन पुरवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक संपन्न झाली. या बैठकीत पालकमंत्र्यांनी खत आणि बियाणे विक्रीमध्ये कोणत्याही प्रकारची लिंकिंग आढळल्यास संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा दिला.
या बैठकीत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांची कोणतीही अडवणूक खपवून घेतली जाणार नाही. बोगस बियाणे आणि खतांची विक्री करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. यासाठी जिल्ह्यात तालुका स्तरावर प्रत्येकी एक आणि जिल्हा स्तरावर एक असे एकूण १६ भरारी पथके स्थापन करण्यात आले आहेत. ही पथके बनावट बियाणे आणि खतांच्या विक्रीवर करडी नजर ठेवणार आहेत.
जनावरांच्या चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध असून, आगामी काळात कोणतीही टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घेतली जाईल. पशुधन हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा आधार आहे आणि त्यांची काळजी घेणे प्रशासनाचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.
जिल्हा नियोजन भवनात झालेल्या या बैठकीला आमदार अमोल पाटील, आमदार अमोल जावळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी, खत आणि बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी, विक्रेते आणि जिल्ह्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
बैठकीत खरीप हंगामासाठी लागणारे पेरणी क्षेत्र, बियाणे आणि खतांची उपलब्धता, सिंचन सुविधा, शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप, फळबाग लागवड, पीक विमा योजना आणि शासनाच्या विविध कृषी योजनांची अंमलबजावणी यावर विस्तृत चर्चा झाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी खरीप हंगामाच्या तयारीचे सविस्तर सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात यंदा ७.६९ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी अपेक्षित असून, त्यापैकी सर्वाधिक ५.०५ लाख हेक्टर क्षेत्र कपाशीच्या लागवडीसाठी निश्चित करण्यात आले आहे.
पालकमंत्र्यांनी यावेळी आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करण्याचे आणि नैसर्गिक संसाधनांचा जपून वापर करण्याचे आवाहन केले. त्यांनी शेतकऱ्यांना उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सकाळी लवकर शेतीची कामे पूर्ण करण्याचा आणि १०० मिमी पावसाच्या नोंदीनंतरच पेरणी करण्याचा सल्ला दिला. तसेच, पेरणीपूर्वी बियाण्यांवर बीजप्रक्रिया करण्याचे आणि धूळपेरणी टाळण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. रासायनिक खतांचा वापर मर्यादित ठेवावा आणि जैविक खतांना प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. बोगस कंपन्यांपासून सावध राहून अधिकृत विक्रेत्यांकडूनच बी-बियाणे खरेदी करण्याचे आणि खरेदीची पक्की पावती घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी १८०० २३३ ४००० हा टोल फ्री क्रमांक प्रभावीपणे कार्यरत ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीत आमदार अमोल पाटील आणि आमदार अमोल जावळे यांनीही शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आणि बोगस कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषी विभागाने राज्य स्तरावर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले.
शेवटी, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना आत्मविश्वासाने शेतीत उतरण्याचे आवाहन केले.