बुलढाण्यात आरोग्य आणि कृषी योजनांवर भर; केंद्रीय मंत्री जाधव यांनी घेतली आढावा बैठक


बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य विभाग आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी १६ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक नियोजन समिती आणि खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याचे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे सक्त निर्देश प्रशासनाला दिले.

आरोग्य विभागाच्या आढाव्यात जाधव यांनी रिक्त पदांची माहिती घेतली आणि ती त्वरित भरण्याची सूचना केली. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांतील कामांना गती देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

याशिवाय, प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय रोजगार हमी योजना आणि पीक विमा योजनांमधील लाभार्थ्यांच्या समस्यांची जाणीव अधिकाऱ्यांना करून दिली. लाभार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दिरंगाईमुळे लाभार्थ्यांचे नुकसान झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून प्रशासनाने कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.

शेतकऱ्यांना प्रलोभने दाखवून बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले. तसेच, महाबीजने संशोधन करून शेतकऱ्यांसाठी संकरित आणि नवीन बियाणे विकसित करावीत, अशी सूचनाही त्यांनी केली. हवामान आणि पर्जन्याचा विचार करून अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांची लागवड करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे निर्देशही जाधव यांनी कृषी विभागाला दिले.