सोशल मीडियावर डॉक्टरची बदनामी; महिलेवर अदखलपात्र गुन्हा दाखल

सावदा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा येथील एका डॉक्टर यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरने कामावरून कमी केल्याचा राग आल्याने महिलेने डॉक्टरांची बदनामी केली, अशी माहिती समोर आली आहे.

सावदा येथील सदगुरू हॉस्पिटलमध्ये संबंधित महिला २०२३ मध्ये पाच ते सहा महिने नर्स म्हणून कामावर होती. मात्र तिची वागणूक योग्य नसल्याने डॉक्टर चेतन कोळंबे यांनी तिला कामावरून कमी केले. याचा राग आल्याने महिलेने १० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपासून तिचे मोबाईल डीपी, स्टेटस आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर तिचा आणि डॉक्टरांचा फोटो लावून डॉक्टरांची बदनामी केली.

याप्रकरणी डॉक्टर चेतन कोळंबे यांनी १२ फेब्रुवारी रोजी सावदा पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीच्या आधारावर महिलेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.