विठ्ठल दर्शनापूर्वीच अंत; अकोल्याच्या वारकऱ्याचा धावत्या रेल्वेतून पडल्याने मृत्यू


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेले शंकर नामदेव राऊत (वय ६८, रा. दानापूर, जि. अकोला) यांचा गुरुवारी (१९ जून) सकाळी जळगाव ते शिरसोली दरम्यान रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गुरुवारी सकाळी तालुका पोलिसांना जळगाव ते शिरसोली दरम्यान रेल्वेतून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोहेकॉ धनराज पाटील आणि गुलाब माळी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला.

सुरुवातीला मृताची ओळख पटली नव्हती. मात्र, नंतर मृताजवळ सापडलेल्या आधारकार्डमुळे त्यांची ओळख पटली. त्यांचे नाव शंकर राऊत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने त्यांच्या मुलाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. शंकर राऊत हे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे दर्शनासाठी जात होते, अशी माहिती त्यांच्या मुलाने पोलिसांना दिली. मात्र, पंढरपूरला पोहोचण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांचा प्रवास अर्ध्यावरच थांबला. या घटनेमुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी समुदायात शोककळा पसरली आहे.