ब्रेकींग : सीसीटीव्हीत कैद ‘हिट अँड रन’: जळगावात महिलेच्या मृत्यूने खळबळ


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात गुरुवारी १९ जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास एका मद्यधुंद चारचाकी चालकाने केलेल्या भीषण ‘हिट अँड रन’ अपघातात ४५ वर्षीय वंदना सुनील गुजराथी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या अपघातात अन्य दोघांनाही गंभीर दुखापत झाले असून, संशयित आरोपी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही हृदयद्रावक घटना शहरातील महाबळ ते वाघनगर रस्त्यावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, महाबळ परिसरात राहणाऱ्या वंदना सुनील गुजराथी गुरुवारी १९ जून रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रस्त्याने पायी जात होत्या. त्याचवेळी शहराकडून वाघनगरकडे भरधाव वेगात येणाऱ्या एका चारचाकी चालकाने त्यांना ओव्हरटेक करताना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, वंदना गुजराथी १५ ते २० फूट दूर फेकल्या गेल्या. एवढ्यावरच न थांबता, मद्यधुंद अवस्थेतील वाहन चालकाने त्याच वेगात पुढे जात आणखी दोघांना धडक दिली. त्याने वाघनगर परिसरातील काही घरांच्या बाहेरील कुंड्या आणि बाकही तोडले.

या सर्व प्रकारानंतर अखेर एका ठिकाणी चिखलात वाहन फसल्याने आरोपी चालकाने तिथून पळ काढला आणि घर गाठले. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर आणि तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रामानंद नगर पोलिसांनी तपास करून मद्यधुंद वाहन चालक मोंटू सैनी याला ताब्यात घेतले आहे. जखमी वंदना गुजराथी यांना काही नागरिकांनी तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र शुक्रवारी २० जून रोजी सकाळी ७ वाजेच्यापुर्वी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

महाबळ ते वाघनगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उतार असल्याने या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतात. भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांवर लगाम घालण्यासाठी या ठिकाणी तात्काळ गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.