जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील मोयगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ९ मे च्या रात्री ते १० मे च्या सकाळच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि तब्बल ३ लाख ३७ हजार ६४४ रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. मात्र, पहाड पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
अधिक माहिती अशी की, रवींद्र पांडुरंग पाटील (वय ४२, रा. मोयगाव) हे आपल्या कुटुंबासह राहतात. ९ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांनी घर बंद केले होते. यादरम्यान अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात व पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने, सोन्याची पोत, कानातील टॉप्स, नथ आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३७ हजार ६४४ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. फिर्यादीने तात्काळ पहाड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात झाली. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सोपान मुरलीधर कोवळे (वय ३५, रा. मोयगाव) याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते करत आहेत.



