Home क्राईम जळगावात स्पिरीटपासून बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त ; १८.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात स्पिरीटपासून बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त ; १८.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
116


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील परिसरात अवैध स्पिरीटपासून बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई येथील भरारी पथकाने जळगावच्या पथकाच्या सहकार्याने धडक कारवाई केली. सिनेस्टाईल छापेमारीत बनावट देशी मद्याचा साठा, बाटल्या, लेबल तसेच बॉटलिंगसाठी लागणारे साहित्य असा तब्बल १८ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई येथील भरारी पथकाला अवैधरीत्या बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने जळगाव येथील संबंधित पथकाला सोबत घेत महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील मुळयावतार परिसरात छापा टाकला. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांची धावपळ उडाली. छापेमारीदरम्यान अवैध स्पिरीटपासून तयार करण्यात आलेला बनावट देशी मद्याचा साठा आढळून आला. तसेच ‘बॉबी संत्रा’ नावाच्या बाटल्या, बनावट लेबल, रिकाम्या बाटल्या, बॉक्स, सीलिंग मशीन आणि बॉटलिंगसाठी लागणारे विविध साहित्य पथकाच्या हाती लागले. या सर्व साहित्याची किंमत मिळून १८ लाख ३२ हजार ५०० रुपये असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले. कारवाईची कुणकुण लागताच या अवैध कारखान्याशी संबंधित दोन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पथकाने त्यांचा शोध सुरू केला असून, या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.

या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुन्हा क्रमांक ५०९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची नोंद करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बनावट मद्याची निर्मिती आणि विक्रीच्या माध्यमातून नागरिकांच्या जीविताशी खेळ करणाऱ्यांविरोधात विभागाकडून कठोर कारवाई केली जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. या कारवाईबाबत राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथील भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक आर. व्ही. चव्हाण यांनी माहिती दिली. फरार दोन्ही आरोपींचा शोध घेऊन या बनावट दारू निर्मितीच्या संपूर्ण साखळीचा छडा लावण्याचे आव्हान आता उत्पादन शुल्क विभागासमोर आहे.


Protected Content

Play sound