
भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्साह भुसावळ शहरात पाहायला मिळाला. मुस्लिम बांधवांच्या वतीने शहरातून भव्य जुलूस काढण्यात आला. या जुलूसदरम्यान हिंदू-मुस्लीम बांधवांनी परस्परांना शुभेच्छा देत सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा संदेश दिला.

भुसावळ शहरातील रजा टॉवर येथून जुलूसला सुरुवात करण्यात आली. मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव या जुलूसमध्ये सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गांवरून हा जुलूस उत्साहपूर्ण वातावरणात मार्गक्रमण करत उर्दू शाळा क्रमांक ३ येथे पोहोचला. तेथे जुलूसचा समारोप करण्यात आला. जुलूसदरम्यान शहरातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे मनोहारी दर्शन घडले. विविध ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या. परस्पर स्नेह, बंधुभाव आणि सामाजिक एकोप्यामुळे संपूर्ण वातावरणात उत्साहाचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, पोलीस प्रशासनाच्या वतीने जुलूसमध्ये सहभागी मुस्लिम बांधवांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. पोलिसांच्या या उपक्रमामुळे प्रशासन आणि नागरिकांमधील सलोख्याचे वातावरण अधिक दृढ झाले. ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या या जुलूसमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग राहिला. शांतता, बंधुभाव आणि एकतेचा संदेश देत मोठ्या जल्लोषात व उत्साहात ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्सव साजरा करण्यात आला.



