‘दाखल्यांची शाळा’ ठरली राज्यभर आदर्श; उपक्रमाला राज्य स्तरावर पुरस्कार!

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी होणारी धावपळ थांबवण्यासाठी जळगाव जिल्ह्यात राबवण्यात आलेला नाविन्यपूर्ण उपक्रम “दाखल्यांची शाळा” आता राज्यभर आदर्श ठरला आहे. या उपक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात सन २०२३ साठी कर्मचारी श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे.

हा अभिनव उपक्रम तत्कालीन जळगाव जिल्ह्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी जे.डी. बंगाळे यांच्या दूरदृष्टी आणि कल्पकतेतून साकार झाला होता. नुकत्याच मुंबईत आयोजित नागरी सेवा दिनाच्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा, तसेच राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. बंगाळे यांना या उत्कृष्ट कार्यासाठी गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांना शिक्षण, शिष्यवृत्ती आणि नोकरीसाठी लागणाऱ्या विविध आवश्यक दाखल्यांसाठी अनेक ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात. यात त्यांचा मौल्यवान वेळ आणि पैसा वाया जातो, तसेच काही वेळा आर्थिक पिळवणुकीलाही सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांच्या याच अडचणी ओळखून श्री. बंगाळे यांनी उन्हाळी सुट्टीच्या काळात “दाखल्यांची शाळा” हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला.

या उपक्रमाच्या माध्यमातून शाळांमध्येच ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले उत्पन्न प्रमाणपत्र, शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र आणि इतर महत्त्वाचे दाखले जागेवरच उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात तब्बल १,१५६ दाखल्यांचे यशस्वी वितरण करण्यात आले, ज्यात जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र आणि उत्पन्न प्रमाणपत्रांचा समावेश होता. या उपक्रमामुळे शासकीय सेवांचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एकाच छताखाली सहजपणे मिळू लागला. या उपक्रमाच्या यशस्वीतेमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, शाळा प्रशासन, महसूल विभाग, ग्रामपंचायत, कोतवाल आणि “आपले सरकार” सेवा केंद्रांच्या चालकांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.

सध्या बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री. बंगाळे यांना यापूर्वी २०१८ मध्ये “राज्य शासनाचा आदर्श तलाठी पुरस्कार” देखील प्रदान करण्यात आला आहे. या राष्ट्रीय स्तरावरील सन्मानानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. बंगाळे म्हणाले, “हा पुरस्कार केवळ माझ्या एकट्याच्या नव्हे, तर माझ्या संपूर्ण टीमच्या अथक परिश्रमांचे फळ आहे. माझे सर्व मार्गदर्शक वरिष्ठ अधिकारी, माझे सहकारी, ग्रामसेवक, शिक्षकवृंद आणि गावकऱ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. हा मिळालेला सन्मान मला भविष्यात अधिक जोमाने आणि चांगल्या पद्धतीने कार्य करण्यासाठी निश्चितच प्रेरणा देईल.”

Protected Content